Social Viral: बायकांच्या काळजाचा ठोका चुकेल, पण ४४०० प्रजातीची झुरळं अस्तित्त्वात; वाचा झुरळपुराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:09 IST2024-12-19T13:08:08+5:302024-12-19T13:09:05+5:30
Social Viral: फोटो आणि शीर्षक वाचून लेख स्क्रोल करू नका, झुरळासारख्या किळसवाण्या किटकाची माहिती वाचून चकित व्हाल हे नक्की!

Social Viral: बायकांच्या काळजाचा ठोका चुकेल, पण ४४०० प्रजातीची झुरळं अस्तित्त्वात; वाचा झुरळपुराण!
>> सिद्धार्थ अकोलकर
आमच्या एका हॉटेलवाल्या मित्राचं बस्तान एका ठिकाणाहून गुंडाळून दुसरीकडे न्यायचं होतं. पुणे कॅम्पमधल्या महात्मा गांधी रस्त्यावर त्याने नवं रेस्टॉरन्ट उघडलं होतं. ‘इधर का माल उधर’ करणं चांगलं जोमात सुरू होतं. इंटिरियरचं काम करणारा आशीष आमचाच जुना मित्र. आमचं संगणकीय सामान, वायर्स वगैरे काढून झालेल्या होत्या पण जरा लुडबूड आणि कुठे लागली तर मदतीत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही तिथे उगाच रेंगाळत होतो. आशीषच्या माणसांनी आज किचन ‘तोडायला’ सुरूवात केली होती. किचन आणि डायनिंग एरिया जोडणारी जाडजूड दुहेरी प्लायची भिंत पडली मात्र, तिथून अक्षरशः लाखो चारकांचे थवेच्या थवे बाहेर पडू लागले.
मी एकदा मधमाशांचं पेव फुटून समोर आलेलं संकट झेललेलं होतं, मुंग्यांची वारूळं फुटून बाहेर येणाऱ्या लाल मुंग्याही अनुभवल्या होत्या, वासोट्याच्या जंगलात चुकून एका डोंगळ्यांच्या घरट्यावरही पाय देऊन जंगलातली समस्त पाखरं उडवणारी बोंबही मारली होती, जेजुरीच्या श्री मल्हारी मार्तंडांच्या कथेत लाखो भुंगे उडालेले वाचले होते पण इथे या चारकांचं म्हणजे झुरळांचं काय करावं ते काही केल्या सुचत नव्हतं. या कीटकांनी जेमतेम दोन मिनिटांत त्या जागी अक्षरशः हैदोस घातला होता. आमच्या अंगाखांद्यांवर तर त्यांचे काटेरी पाय टोचत होतेच पण आता शेजारपाजारचे दुकानदार आणि त्यांचे ग्राहकही विचित्र नृत्य करून हातपाय झाडू लागलेले होते. हजारो रुपये खर्च करून केलेल्या ‘पेस्ट कंट्रोल’चा काहीही उपयोग झालेला दिसत नव्हता.
मागच्या वर्षी मी डासांबद्दल लिहिलं होतं. त्यांच्यात आणि या झुरळांत साम्य काय, तर मानवासाठी विनाशकारी समजले जाणारे हे दोन्ही पंखधारी कीटक आपल्या पृथ्वीवर काही कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. झुरळांची उत्पत्ती तर डासांपेक्षाही जुनी, म्हणजे साधारणतः २५ कोटी वर्षांपूर्वीची मानली जाते. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या त्या निऑप्टेरन शरीररचनेत फारसा बदल झालेला नाही म्हणून त्यांना ‘जिवंत जीवाश्म’ असंही म्हणतात. आपल्या माहितीत त्यांच्यासारखा चिवट आणि टिकाऊ कीटक दुसरा नाहीच! अगदी सहारा वाळवंटातील प्रखर उष्णतेपासून ते थेट अंटाक्र्टिकामधल्या उणे तापमानापर्यंत ती सगळीकडे आढळून येतात.
झुरळाच्या सुमारे ४४०० जाती आपल्याला माहित आहेत. त्यापैकी केवळ तीसेक जाती आपल्या जवळपास वावरणाऱ्या आहेत. सूक्ष्मजीव वा कीटक हे त्यांच्या अमर्यादित संख्याबळाने आपल्यावर कायम कुरघोडी करायला बघत असतात. त्यातलं हे झुरळ तर रोगराई पसरवण्यात अगदी आघाडीवर असतं. झुरळामुळे क्षय, कावीळ, पटकी, विषमज्वर यांसारखे रोग पसरवले जातात. पक्षाघातासारखा आजारही विशिष्ट जातीच्या झुरळांमुळे होऊ शकतो. त्यांची विष्ठा, लाळ, अंडी आणि टाकलेली कात हे घटक चांगलेच ‘ॲलर्जी’कारक असतात, विशेषतः लहान मुलांसाठी जास्त धोकादायक ठरतात. या ॲलर्जीमुळे दम्यासारखे विकार कायमचे मागे लागतात. जर झुरळांनी आपली जेवणाची भांडी वा खाद्यपदार्थ दूषित केले तर त्यांच्या आतड्यांमध्ये असलेल्या एकूण ३३ प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे आपल्याला असंख्य व्याधींचा सामना करावा लागू शकतो, मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो, पचनाचे विकार बळावण्याची शक्यताही असते, इत्यादि.
काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क सिटीमध्ये एका लहान मुलीच्या कानाची तपासणी सुरू होती. ‘अचानक ऐकू येणं कमी झालंय’, अशी तिच्या पालकांची तक्रार होती. स्कॅनमध्ये झुरळाच्या मादीने तिच्या दोन्ही कानात अंडी घातल्याचं दिसून आलं. नशीब, ती अंडी फुटायची बाकी होती. आपल्या निजायच्या ठिकाणी, गादीवर बसून, कधी काही खाणं खाऊ नये ते याचसाठी! आपल्या हातून सांडलेला छोटासा पदार्थकणसुद्धा झुरळं किंवा मुंग्यांसाठी अन्नाचा डोंगर असू शकतो आणि जिथे सहजगत्या खायला मिळतं तिथे ते त्यांची वस्ती वाढवतातच!
झुरळांना ज्या जागी थोडीशी उब, मुबलक अन्नपाणी आणि काहीसा ओलावा मिळेल त्या जागी त्यांची संख्या पटापट वाढवण्यात रस असतो. जिथे कुठे विस्तव पेटतो तिथे ती हमखास आढळतात. अन्न म्हणून त्यांना अगदी काहीही चालतं. झुरळं सर्वभक्षी असतात. तोंडाच्या जागी असलेल्या छोट्या कातरीसारख्या भागाने ते वस्तू कुरतडून खातात. साध्या एका शेंगदाण्यावर एक झुरळ सलग काही दिवस चरू शकतं. एकदा पोट भरलं आणि नंतर काही खायला मिळालं नाही तरी ते कित्येक दिवस उपाशी राहू शकतं. झुरळ हे पक्कं दिवाभीत आणि निशाचर असतं. त्यामुळे अन्न शोधायला फक्त रात्रीच्या अंधारात बाहेर पडतं. स्वयंपाकघरात ठेवलेली खरकटी भांडी ही झुरळांची ‘पार्टी’ करायची आवडती जागा असते. मादी झुरळ नरापेक्षा दुप्पट अन्नं, म्हणजे सुमारे ३० ते ५० ग्रॅम पदार्थ, रोज (मिळाले तर) फस्त करते.
खजूरासारख्या रंगाच्या मोठ्या झुरळाचं शास्त्रीय नाव पेरिप्लॅनेटा अमेरिकाना असं आहे. मानवी वस्तीमध्ये या झुरळाने चांगलं बस्तान बसवलेलं आहे. वरवर अगदी चकाचक दिसणाऱ्या स्वच्छ शहरांच्या पोटामधून मोठ्या प्रमाणात गटारं वाहत असतात. या गटारांमध्ये येणाऱ्या सांडपाण्याच्या नळांमधून वर चाल करून झुरळं घरात येतात. त्यांचे अशा ठिकाणचे शेजारी म्हणजे असंख्य उंदीर, पण त्या नळांच्या घरातल्या भागांवर बसवल्या जाणाऱ्या जाळ्यांमुळे उंदीर घरामध्ये सहजी प्रवेश करू शकत नाहीत. झुरळाला मात्र अंग चोरायची विद्या अवगत असल्याने कितीही बारीक भोकांची जाळी असली तरी ती सहज भेदून ते घरात अवतरतातच.
दुसरं महायुद्ध संपत आलं होतं. पर्सी स्पेन्सर युद्धातल्या काही शस्त्रांसाठी वापरला जाणारा एक मॅग्नेट्रॉन तपासत बसलेला होता. काही कारणाने फक्त अर्ध्या मिनीटासाठी तो बाजूला गेला आणि परत आला तर त्याने जवळच ठेवलेला एक खाद्यपदार्थ जवळजवळ वितळून गेलेला होता. जगासाठी मायक्रोवेव्हचा शोध असा अपघातानेच लागला. याचा झुरळांशी काय संबंध?, तर अमेरिकेने त्यांच्या शहरांमधून प्रचंड प्रमाणात वाढलेली झुरळं नष्ट करण्यासाठी १९८०च्या दशकात चक्क मायक्रोवेव्ह्जही वापरून बघितलेल्या होत्या. अर्थात उच्च दर्जाचा किरणोत्सारही हसत-हसत झेलू शकणाऱ्या पृथ्वीवरच्या या आदीम कीटकाने त्या अमेरिकन मायक्रोवेव्हज सहज परतावून लावल्या. नव्वदच्या दशकानंतर घरातली झुरळं (शिजवून) मारायची ही पद्धत निकामी ठरून शेवटी बंद पडली.
झुरळं मारून त्यांचा समूळ नायनाट करणं ही एक अशक्यप्राय गोष्ट समजली जाते. हा समूहप्रिय कीटक मारण्यासाठी त्यावर अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत पण अजूनही मानवाला त्यावरचा रामबाण उपाय काही मिळालेला नाही. झुरळाचं डोकं तोडलं तरी, त्याच्या शरीरक्रियेत रक्तदाब ही संकल्पनाच नसल्याने, ते चांगलं महिनाभरही जिवंत राहू शकतं. झुरळांच्या काही जाती अन्नपाण्याशिवाय कित्येक आठवडे तग धरू शकतात. काही जाती हवेशिवाय ४५ मिनिटं जगू शकतात. कडाक्याच्या थंडीतही ती टिकाव धरतात. अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवल्यानंतरही झुरळं पुन्हा हालचाल करू लागतात. पेशी विभाजनाच्या अत्यंत संथ चक्रामुळे इतर यच्चयावत पृष्ठवंशीय प्राण्यांच्या तुलनेत झुरळांवर किरणोत्साराचा परिणाम कमी होतो. मात्र किरणोत्सार-संग सतत दीर्घकाळ होत राहिला तर झुरळं नक्की मरतात. पण यात समस्या अशी की किरणोत्साराची जी मात्रा मनुष्यासाठी जीवघेणी ठरते तिच्यापेक्षा ६ ते १५ पट मात्रा झुरळं सहजगत्या सहन करू शकतात. त्यांना मारणार तरी कसं मग?
आपण फक्त झुरळांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीचे प्रयत्न तेवढे करू शकतो. झुरळ हे अस्वच्छ परिस्थितीचं प्रतीक आहे. त्यामुळे घराची आणि परिसराची ठेवावी लागणारी स्वच्छता आणि कोरडेपणा हा कळीचा मुद्दा आहे. झुरळांना लपण हवं असतं. दडून बसायला त्यांना एक बारीकशी फटसुद्धा पुरते पण तरीही जर आपण घरातली अडगळ वा अंगणातलं निरूपयोगी सामान जरा कमी केलं, स्वयंपाकाची भांडी-कुंडी वेळच्या वेळी साफ करून निथळत ठेवली, गाद्यांना तीन महिन्यांतून एकदा उन्हं दाखवली, कपाटं, साठवणीच्या जागा साफ ठेवल्या, त्यामध्ये नॅपथॅलीन बॉल्स ठेवले तर झुरळांची संख्या बऱ्यापैकी मर्यादेत राहते. खास करून अडगळीच्या जागी नैसर्गिकरित्याच एका पद्धतीचं तापमान नियंत्रण होत असतं जिथे झुरळांना अंडी घालायला फार आवडतं. त्यामुळे आपण अनावश्यक गोष्टींची साठेबाजी टाळणं गरजेचं आहे.
झुरळांमध्ये विशिष्ट प्रजनन कालावधी पाळला जात नाही पण काही जातींचा मुख्य प्रजनन काल मार्च ते सप्टेंबर असतो कारण या सुमारास त्यांची अंडी उबण्यासाठी लागणारं तापमान आयतं तयार असतं. साधारणपणे प्रत्येक २५ दिवसांनंतर मादी आडोशाला, सुरक्षित जागी तपकिरी रंगाची, चवळीच्या दाण्याच्या आकाराची अंडपेटी चिकटवते. हवेतील उष्णतेनुसार सुमारे ४० दिवसांनंतर ती फुटून त्यातून बारीक आकाराची पिल्लं बाहेर येतात. एका अंडपेटीतून कमीतकमी १६ पिल्लं तरी जन्म घेतात. बाहेर आल्या आल्या ती अन्नाच्या शोधात इतस्ततः भटकायला लागतात. त्यांच्या काही जातींमध्ये मादी एकदाच मीलन करते आणि आयुष्यभर गाभण राहते. शरीराची वाढ होताना बाकी असंख्य कीटकांसारखीच ही झुरळंसुद्धा कात टाकतात. पूर्ण आयुष्य मिळालं तर एक झुरळ दहा ते बारा वेळा कात टाकतं.
सन १९९५-९६मध्ये आमच्या पहिल्या मजल्यावरच्या स्वयंपाकघरात प्रचंड झुरळं झालेली होती. काही केल्या त्यांची संख्या आटोक्यात येत नव्हती. डीडीटी, बेगॉन, पॅरॅगॉन चपला, गॅमेक्झिन चूर्ण, अगदी सगळं वापरून झालं. असेच काही महिने गेले आणि अचानक लक्षात आलं की आता झुरळं तेवढ्या संख्येने दिसत नाहीयेत. एव्हाना बाहेर चांगला मृगाचा पाऊस पडत होता आणि अचानक आमच्या फ्रीजखालून ‘डरॉंव-डरॉंव’ असा आवाज आला. आमचे चारपायी कुटुंब सदस्य श्रीमान टॉमी महाराज रोज कितीतरी वेळ फ्रीज हुंगत का बसायचे याचं उत्तर सापडलं. कुठून कुणास ठाऊक, पण चक्क एक बेडूक घरात येऊन राहिलेला होता. त्याचंही आम्ही नाव ठेवलं, जॉनी!
नंतर मग आम्ही जॉनीवर पाळत ठेवायला सुरूवात केली. रात्री दिवे बंद झाले की तो फ्रीजखालच्या पाण्याच्या ट्रेमधून बाहेर पडायचा. स्वैपाकघरात इकडे-तिकडे उड्या मारून किमान दहा ते बारा झुरळं तरी संपवायचाच. भरपेट खाणं झालं की थोड्या वेळासाठी टॉमीच्या पाणी प्यायच्या भांड्यात जाऊन बसायचा. उजाडू लागलं की परत जायच्या रस्त्यावर एखाद दुसरं झुरळ मारून खायचा आणि दिवसभरासाठी पुन्हा फ्रीजखाली मुक्काम ठोकायचा. ‘टॉमी रोज सकाळी त्याचं पाण्याचं भांडं का उलटवून टाकतो’, या प्रश्नाचं उत्तरही मिळून गेलं. या एकाच बेडूकरावांनी पावसाळ्याच्या चार महिन्यांत आमच्या घरातली तमाम झुरळं फस्त करून टाकली. नंतर तो जॉनी आकाराने चांगला मोठा झाल्याने आम्ही त्याला घरामागच्या पाणथळी जागेत सोडून दिला.
अंडाकृती आकार आणि सपाट उदर भाग, लवलवत्या अँटेनाची एक जोडी, पायांच्या तीन जोड्या आणि अत्यंत विकसित बलवान स्नायू ही झुरळांची शरीर वैशिष्ट्ये आहेत. डोळे डोक्याच्या बाजूला असतात आणि सर्व दिशांना बघू शकतात. त्यांना नाक नसतं. शरीराच्या बाजूस असलेल्या रंध्रांमधून ते हवा शोषून घेतात. संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या डिक्टिऑप्टेरा गणाच्या ब्लॅटिडी कुळात या सर्वपरिचित उपद्रवी झुरळांचा समावेश होतो. हा कीटक बघितलाच नसेल असा माणूस सापडणं महादुर्मीळ! झुरळाचं मूलस्थान उष्ण कटिबंधीय आफ्रिका प्रदेश आहे. उष्ण प्रदेशात त्यांची वाढ दसपटीने फोफावलेली दिसते. आपल्यासाठी महाउपद्रवी असणाऱ्या या कीटकावर कोंबडी, पाल/ सरडा, कोळी, मांजर, चिचुंदरी, विंचू आणि बेडूक यांचं नियमित भक्ष्य होण्याची जबाबदारी निसर्गचक्राने दिलेली आहे. खरं तर निसर्गात निरूपयोगी असं काहीही नसतंच मुळी!
आपण मानवही अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीररचनेचा प्राथमिक अभ्यास करण्यासाठी/ शिकण्यासाठी झुरळांचं विच्छेदन करतो. कीटकांचं शरीरक्रियाशास्त्र, जीवरसायनशास्त्र आणि विषशास्त्र या संशोधनात झुरळांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. औषधनिर्माण शास्त्रातही झुरळांचा वापर ‘टेस्टिंग’साठी केला जातो. लोकवैद्यकामध्ये म्हणजेच अनुभवसिद्ध पारंपरिक वैद्यकात, झुरळ हे कर्करोगाचे आणि अन्य प्रकारचे व्रण बरे करण्यासाठी, कृमिनाशक म्हणून, तसंच जलोदरात जलसंचय परिहारासाठी देखील वापरलं जातं. अन्नपचनास मदत होण्यासाठी तेलात लसणीबरोबर झुरळ तळून दिलं जातं असा प्राचीन उल्लेख सापडलेला आहे. सन १९६२ पर्यंत आपले भाई-भाई असलेले चिनी लोक आजही त्यांच्या आहारात झुरळांचा मुबलक वापर करतात.
कोणे एके काळी रशियाने एक नादेज्दा नावाची झुरळीण त्यांच्या यानातून थेट अंतरिक्षात पाठवली होती. फोटॉन-एम नावाच्या या प्रायोगिक मिशनमध्ये बाकी झुरळांचाही समावेश होता. नादेज्दा बाईंनी अवकाशात हे मिशन सुरू असताना त्यातल्याच एका श्रीयुत झुरळ यांच्याशी संधान बांधलं आणि यान पृथ्वीवर आल्यावर अंडपेटी घालून पिल्लांना जन्म दिला. नादेज्दाचं नाव अंतरिक्षात मीलन करून पृथ्वीवर त्यांच्या प्रजातीला जन्म देणारा इतिहासातील पहिला जीव म्हणून नोंदवलं गेलं आहे. बाकी कुणी असा ‘पराक्रम’ केल्याचं माझ्यातरी वाचनात आजपावेतो आलेलं नाही.
मानवजातीच्या आधीपासून अस्तित्त्वात असलेला हा जीव मानवाने लिहिलेल्या साहित्यांमधूनही हळूच दिसून जातो. ॲरिस्टॉटल या ग्रीक विद्वानाने झुरळाचा उल्लेख त्वचेचा त्याग करणारा (कात टाकणारा) किडा असा केलेला आहे. ख्यातनाम ग्रीक नाटककार आणि लेखक ॲरिस्टोफेनिसच्या पीस (Peace) या नाटकांत ‘कुबट वास पसरवणारा कीटक’ असा त्याचा उल्लेख आहे. सॉक्रेटिसकालीन इव्हनूस (युनूस?) या ख्रि.पू. पाचव्या शतकातल्या कवीने, ‘पुस्तकांची पानं खाऊन ती नष्ट करणारा काळतोंड्या कीटक’ अशी झुरळांना लाखोली वाहिलेली आहे. ख्रि.पू. एकोणिसाव्या शतकातल्या व्हर्जिलने झुरळांना ल्युसिफुगा म्हणजे दिवाभीत म्हटलेलं आहे. पहिल्या शतकातले रोमन आरमार प्रमुख, थोरल्या प्लिनी साहेबांच्या ‘हिस्तोरीया नॅच्युरालिस’मध्ये मात्र त्यांनी झुरळांचे औषधी उपयोग दिलेले आहेत. त्यांचेच समकालीन असलेल्या पेडानिअस डिओस्कोरीडेस या रोमन वैद्य महाशयांनी झुरळाचं तेलामध्ये कालवून तयार केलेलं चूर्ण कानदुखीवर फार उत्तम काम करतं असं नमूद करून ठेवलंय.
तर, असो! देवाने पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाकडून आपल्याला शिकण्यासारखं काही दिलेलं आहे. जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करायला आडकाठी का करावी! झुरळांचं अस्तित्त्वाच्या कोणत्याही टप्प्यावर प्राप्त परिस्थितीशी उत्तमरित्या जुळवून घेणं खरोखर वाखाणण्यायोग्य आहे. त्यांची चिकाटी आणि चिवटपणा आपल्या मनाला दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवू पाहत असतो, ते आपण टिपून शिकायला हवं. झुरळांचं समूहभान प्रगत स्वरूपाचं आहे. एकमेकांना मदत करीत निसर्गचक्रात त्यांचं पुढे जाणं थक्क करून सोडणारं आहे. सूर्यापासून तिसऱ्या स्थानावर असलेल्या या जलयुक्त नीलग्रहावर येणाऱ्या अनेक आपत्तींपासून आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर झुरळाचा आदर्श समोर ठेवत जगून बघायला हवं… काय हरकत आहे..?