तुमच्या बॉसला टॅग करा! या कंपनीकडून दिवाळीला मिळाली डबल सूटकेस आणि प्रीमियम स्नॅक्स; सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:50 IST2025-10-16T17:49:24+5:302025-10-16T17:50:41+5:30
नोएडातल्या या कंपनीने दिवाळी भेट म्हणून कर्मचाऱ्यांना ट्रॉली बॅग्ज वाटल्या.

तुमच्या बॉसला टॅग करा! या कंपनीकडून दिवाळीला मिळाली डबल सूटकेस आणि प्रीमियम स्नॅक्स; सोशल मीडियावर चर्चा
Info Edge Diwali Gift: दिवाळी आली की वर्षभर मेहनत घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते की, कंपनीकडून आपल्याला काहीतरी खास गिफ्ट मिळेल, पण अनेकदा अपेक्षाभंग होतो. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळणाऱ्या भेटवस्तू पाहून कर्मचारी हताश होतात आणि अशा भेटवस्तूंवर सोशल मीडियावर मीम्स देखील तयार होतात. गेली कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांना सोनपापडी ही मिठाई देण्यात येत होती. मात्र नोएडातल्या एका कंपनीने आपल्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांवर खूष होऊन त्यांना असं गिफ्ट दिलंय ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नोएडातल्या एका आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तूंमुळे त्याची जोरदार चर्चा होत आहे. ‘नौकरी डॉट कॉम’ आणि ‘९९ एकर्स’ यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या इन्फो एज या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत खास दिवाळी भेटवस्तू दिली, ज्याचे व्हिडीओ आणि रील्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इन्फो एज कंपनीने कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक-एक मोठी सुटकेस (प्रवासाची बॅग) दिली. ती सुटकेस उघडल्यावर, त्यातून आणखी एक सुटकेस बाहेर निघाली. त्याचबरोबर कंपनीकडून स्नॅक्स आणि चॉकलेट्सनी भरलेला एक बॉक्सही देण्यात आला. या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना एक दिवा देखील मिळाला.
कंपनीकडून मिळालेल्या या भेटवस्तूंचे अनेक कर्मचाऱ्यांनी इन्स्टाग्रामवर ‘अनबॉक्सिंग रील्स’ शेअर केले. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, "तुम्ही माझ्या कंपनीला हे व्हिडिओ दाखवता का?" असं म्हटलं तर दुसऱ्याने, "इन्फो एजमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची आता वेळ आली आहे," अशी प्रतिक्रिया दिली. कर्मचाऱ्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कंपनीने उचललेले हे पाऊल देशभर कौतुकाचा विषय ठरले आहे.
या घटनेमुळे कॉर्पोरेट जगतात एक नवा बेंचमार्क सेट झाला असून, कर्मचाऱ्यांना केवळ औपचारिक भेटवस्तू न देता, त्यांच्या मेहनतीची खऱ्या अर्थाने कदर केल्यास त्याचे सकारात्मक पडसाद कंपनीसाठी किती फायदेशीर ठरू शकतात, हे इन्फो एजने दाखवून दिले आहे.