"६ महिन्यापासून पगार नाही, घर सांभाळणंही कठीण झालं..."; पाकिस्तानातील अधिकाऱ्याचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 07:45 IST2025-12-11T07:44:45+5:302025-12-11T07:45:50+5:30
मी ड्युटी करतोय, पण पिण्याच्या पाण्यासारखी मुलभूत गरजही पूर्ण करू शकत नाही असं त्याने सांगितले.

"६ महिन्यापासून पगार नाही, घर सांभाळणंही कठीण झालं..."; पाकिस्तानातील अधिकाऱ्याचा Video व्हायरल
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा पर्यटन पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागील ६ सहा महिन्यापासून पर्यटन पोलिसांना पगार नाही. यातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या पाकिस्तानात वेगाने व्हायरल होत आहे जे पाहून लोकांमधील असंतोष वाढत आहे. खैबर पख्तूनख्वा सरकारच्या या खास फोर्ससोबत होत असलेल्या निष्काळजीपणावरून पाकिस्तानात वादंग पेटला आहे.
या व्हिडिओत तो अधिकारी अत्यंत त्रस्त दिसतो. तो सांगतो की, स्वात, ऐबटाबाद, नारन, काघान, चितरल आणि अन्य पर्यटन परिसरात तैनात असणारे कर्मचारी सध्या मानसिक आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहेत. ६ महिने होत आले आमचा पगार आणि कामाची मुदतवाढ रखडली आहे. सातत्याने दबाव आणि अपमानाचा सामना आम्हाला करावा लागतो. मी ड्युटी करतोय, पण पिण्याच्या पाण्यासारखी मुलभूत गरजही पूर्ण करू शकत नाही असं त्याने सांगितले.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली
अनेक अधिकाऱ्यांनी म्हटलं की, आम्ही दररोज कामावर जातो. परंतु घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे. भाडे भरता येत नाही. घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे शुल्कही देणे कठीण झालं आहे. त्यातच सीजनच्या काळात आम्हाला डबल ड्युटी करावी लागते. वाहतूक सांभाळणे, पर्यटकांना मदत करणे, तक्रारी सोडवणे, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणे इतके सर्व काही करूनही आम्हाला विना वेतन राहावे लागते ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
KP tourism Police. pic.twitter.com/bwJx105wdx
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 30, 2025
पगार का मिळत नाही?
पाकिस्तानात सध्या बिकट आर्थिक परिस्थिती आहे. दीर्घ काळ निधी वाटप होत नाही. प्रशासकीय अडचणी उभ्या राहतात त्यामुळे वेळेवर पगार मिळत नाही. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे पर्यटनावरील निधी जारी केला जात नाही. वेगवेगळ्या विभागात फाईली धूळ खात पडत आहेत ज्यामुळे फंड ट्रान्सफर पुढे सरकत नाही. पर्यटन पोलिसांमधील अनेक कर्मचारी कंत्राटी आहेत त्यांचे वेळेवर रिन्यूअल न झाल्याने पगारासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागते.
पर्यटकांची सुरक्षा बेभरोसे
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नसल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. यात पगार मिळण्यासाठी आणखी उशीर झाला तर आपत्कालीन सेवा ठप्प होईल. वाहतूक व्यवस्था कोलमडेल आणि पर्यटकांच्या तक्रारी वाढतील. त्याशिवाय खैबर पख्तूनख्वा याच्या पर्यटन क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागेल. पर्यटकांची सुरक्षा बेभरोसे होईल.