रीलचा नाद लय बेक्कार! आई Video काढण्यात बिझी, चिमुकली लेक पोहोचली हायवेवर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:13 IST2024-12-09T18:13:30+5:302024-12-09T18:13:57+5:30
२९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हायवेच्या बाजूला जमिनीवर कॅमेरा ठेवून एक महिला रील बनवताना दिसत आहे.

फोटो - आजतक
रील्स बनवण्याच्या नादात अनेक लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीवच नाही तर इतरांचाही जीव देखील धोक्यात येतो. आपलं रील सोशल मीडियावर व्हायरल व्हावं हाच त्यांचा उद्देश असतो. पण कधी कधी रील बनवण्याच्या नादात त्यांना खऱ्या आयुष्यातील जबाबदाऱ्यांचा विसर होतो. नुकतीच अशीच एक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
२९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हायवेच्या बाजूला जमिनीवर कॅमेरा ठेवून एक महिला रील बनवताना दिसत आहे. तिच्या हातात आणखी एक कॅमेरा आहे, ज्याच्या मदतीने ती स्वत: डान्स करताना व्हि़डीओ काढत आहे. महिलेच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाचं जॅकेट घातलेली एक छोटी मुलगी हायवेकडे जाताना दिसते. याच दरम्यान, काळ्या रंगाचं जॅकेट घातलेला एक मुलगा त्या महिलेकडे येतो आणि मुलगी रस्त्याच्या दिशेने जात असल्याचं सांगतो.
मुलगी हायवेकडे जात असलेली पाहून महिला लगेच कॅमेरा सोडून मुलीच्या दिशेने जोरात धाव घेते आणि तिला पकडून पुन्हा कॅमेऱ्यासमोर आणते. याच दरम्यान रस्त्यावरून गाड्या देखील जाताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक याला वाईट पालकत्वाचं उदाहरण म्हणत आहेत आणि महिलेवर जोरदार टीका करत आहेत.
रील बनवताना इतका निष्काळजीपणा कसा असू शकतो, आपली मुलगी हायवेच्या दिशेने निघाली आहे हे कसं समजलं नाही? असे प्रश्न लोक विचारत आहेत. काही लोकांनी महिलेला शिक्षा म्हणून जेलमध्ये पाठवा असंही म्हटलं आहे. रीलच्या नादात अनेक धक्कादायक घटना याआधी देखील घ़डल्या आहेत. काही घटनांमध्ये लोकांनी व्हिडीओच्या नादात जीवही गमावला आहे.