ऑफिसमधून सुटी घेण्यासाठी तरुणाने बनवलं आजोबांचं खोटं डेथ सर्टिफिकेट; गर्लफ्रेंड ठरली कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:10 IST2025-02-18T16:10:17+5:302025-02-18T16:10:54+5:30
एका तरुणाने ऑफिसमधून सुटी मिळविण्यासाठी आपल्या आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं.

ऑफिसमधून सुटी घेण्यासाठी तरुणाने बनवलं आजोबांचं खोटं डेथ सर्टिफिकेट; गर्लफ्रेंड ठरली कारण?
सिंगापूरमध्ये आपल्या गर्लफ्रेंडने धोका दिल्यामुळे नाराज झालेल्या एका तरुणाने ऑफिसमधून सुटी मिळविण्यासाठी आपल्या आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र बनवलं. २९ वर्षीय भरत गोपाळ नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ पर्यंत सिक्युरिटीज फायनान्सिंग ऑपरेशन्स एनालिस्ट म्हणून काम करत होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये, भरतच्या गर्लफ्रेंडने त्याला फसवलं, ज्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याचं कामात मन लागत नव्हतं.
भरतकडे चार दिवसांपेक्षा जास्त दिवसाची सुटी शिल्लक होती, पण भरतने त्याच्या सुपरवायझरला खोटं सांगितलं की त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला. त्याने ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सुटी मागितली. सुपरवायझरने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याचं ऐकलं.
जेव्हा सुपरवायझरने त्याच्या आजोबांचं मृत्यू प्रमाणपत्र मागितलं तेव्हा भरत म्हणाला की, त्याचे वडील भारतातून परतल्यानंतरच ते मिळू शकेल. यानंतर लगेचच, भरतने जुलै २०२३ मध्ये मृत्युमुखी पडलेल्या त्याच्या एका मित्राच्या नातेवाईकाकडून मृत्यू प्रमाणपत्राची प्रत मागितली. त्याने नातेवाईकाला सांगितलं की कामासाठी त्याची आवश्यकता आहे.
भरतने आपल्या लॅपटॉपवर आजोबांचं खोटं मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आणि त्याचा एक भाग त्याच्या सुपरवायझरला पाठवला. त्याने कागदपत्राचा खालचा भाग जाणूनबुजून वगळला, ज्यामध्ये प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्यासाठी एक QR कोड होता. सुपरवायझरने त्याला सांगितल्यावर त्याने शेवटी संपूर्ण कागदपत्र पाठवलं. जेव्हा भरतला आपला खोटेपणा पकडला जाईल हे समजलं तेव्हा त्याने डिसेंबरमध्ये राजीनामा दिला.