VIDEO: महिलेचा युटर्न लोकांना पडला भारी; १० बस धडकल्या अन् ट्रॅफिक जॅम वेगळंच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:01 IST2025-01-29T17:50:23+5:302025-01-29T18:01:23+5:30
केरळमध्ये एका स्कूटीवरील महिलेने चुकीच्या पद्धतीने युटर्न घेण्याचा प्रयत्न केल्याने अनेक वाहनांचा अपघात झाला.

VIDEO: महिलेचा युटर्न लोकांना पडला भारी; १० बस धडकल्या अन् ट्रॅफिक जॅम वेगळंच
Kerala Accident: केरळमध्ये चुकीच्या पद्धतीने युटर्न घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना समोर आली आहे. एका बसच्या डॅशकॅममध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये स्कूटरवरील एक महिला चुकीच्या पद्धतीने युटर्न घेत असल्याचे दिसून येते. त्यावेळी मागून येणाऱ्या गाडीची तिला धडक बसते. त्यानंतर बस थांबल्याने मागून येणाऱ्या बस एकमेकांवर आदळल्या आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघातामुळे, बस प्रवाशांना खाली उतरून पायी प्रवास करावा लागला.
२७ जानेवारी रोजी ही घटना केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची येथील विटिला परिसरात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून स्कूटी चालवणाऱ्या महिलेमुळे तब्बल नऊ ते १० वाहनं एकमेकांना धकडली असून त्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. मात्र महिलेच्या एका चुकीमुळे इतक्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागल्यामुळे सोशल मीडियावर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्कूटरवरील एक महिला रस्त्याच्या मधोमध युटर्न घेताना दिसत आहे. त्यावेळी समोरुन बाईकवरुन येणारी एक व्यक्ती महिलेला वाचवण्यासाठी ब्रेक लावतो. मात्र मागच्या बसने बाईकला धडक दिल्याने स्कूटीवरील महिला खाली पडले. खाजगी बसने ब्रेक लावल्याने मागून येणार्या शाळेच्या बस एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यामध्ये खासगी बससह शाळेच्या बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
ஒரே ஒரு ஆபாயில், பல வண்டிகள் காலி 🔥 pic.twitter.com/4PnjuGb6KB
— 𝗟 𝗼 𝗹 𝗹 𝘂 𝗯 𝗲 𝗲 (@Lollubee) January 28, 2025
महिलेकडून नुकसान भरपाई घ्या; नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
"महिलेची स्कूटी जप्त करा आणि तिचे लायसन्स रद्द करा. या महिलेकडून सर्व नुकसान भरपाई घ्या. जर आपण अशा लोकांबद्दल सौम्य भूमिका घेतली तर ते पुन्हा अशी चूक करणार नाहीत. या घटनेनंतर त्या महिलेला कोणताही पश्चात्ताप नव्हता आणि ती एखाद्या हिरोईनसारखी पाहत होती," असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. "त्या महिलेला इतक्या जीवांना धोका निर्माण केल्याबद्दल तुरुंगात टाका आणि तिच्याकडून सर्व नुकसान भरपाईचे पैसे घ्या," अशी मागणी एका नेटकऱ्याने केली. तर "महिलेला रस्ता ओलांडण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. पलक्कडमध्ये अनेक वेळा पाहिले आहे. ते फक्त रस्ते ओलांडतात किंवा यू टर्न घेतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नेहमीप्रमाणे घाईत असतात," असंही एका नेटकऱ्याने म्हटलं.