'मी पैसे द्यायला विसरले,' अमेरिकेत महिलेने भावासाठी चोरले 'मेड इन यूएस' कपडे, पकडल्यानंतर अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:29 IST2025-11-03T15:19:24+5:302025-11-03T15:29:51+5:30
अमेरिकेत एका भारतीय महिलेला एका दुकानात चोरी करताना पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

'मी पैसे द्यायला विसरले,' अमेरिकेत महिलेने भावासाठी चोरले 'मेड इन यूएस' कपडे, पकडल्यानंतर अश्रू अनावर
Indian Woman Caught Stealing: अमेरिकेत एका भारतीय महिलेवर एका स्टोरमधून कपडे चोरल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला. चोरी पकडल्यानंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांसमोर हात जोडून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या महिलेनने केलेल्या कृतीमुळे परदेशात भारतीयांची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दल अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.
नेमके काय घडले?
संबंधित भारतीय महिलेला एका स्टोरमधून कपडे चोरताना पकडण्यात आले. व्हिडिओमध्ये ही महिला वारंवार पोलिस अधिकाऱ्यांकडे माफी मागताना आणि एक संधी देण्याची विनंती करताना दिसत आहे. तिने पोलिसांना सांगितले की, "हे कपडे मी माझ्या भावासाठी घेतले होते. माझा भाऊ भारतात राहतो आणि त्याला 'Made in USA' च्या वस्तू खूप आवडतात, पण तो त्या खरेदी करू शकत नाही." महिला आपण वस्तूंचे पैसे देण्याचे विसरल्याचे वारंवार सांगत होती.
पोलीस तिला पाठीमागे वळायला सांगत होते पण तिने वारंवार नकार दिला आणि हात जोडून बेड्या न घालण्याची विनंती केली. पोलिसांनी अनेक वेळा सांगूनही तिने ऐकले नाही. अखेरीस, पोलिसांनी तिला बळजबरीने बेड्या लावल्या. व्हिडीओमध्ये ती विचारते की तिला बेड्या लावल्यानंतर काय होईल, तेव्हा एक अधिकारी तिला सांगतो की तिला पोलिस स्टेशनमध्ये नेले जाईल, कारवाई होईल आणि काही तासांत सोडले जाईल. ती महिला रडत असताना तिच्या पतीला फोन करण्याची विनंती करते, पण अधिकाऱ्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.
मे महिन्यातही अमेरिकेतील इलिनॉयस राज्यात अशाच प्रकारे एका भारतीय महिलेवर टारगेट स्टोरमधून सुमारे १.१ लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याचा आरोप झाला होता. ती महिला जवळपास सात तास स्टोरमध्ये थांबली आणि पेमेंट न करता गाडीत सामान घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी विचारले असता तिने माफी मागितली आणि "मी या देशाची नाही, मला माफ करा" असे म्हटले होते. यावर अमेरिकेच्या अधिकाऱ्याने तिला, "भारतात काय चोरी करण्याची परवानगी आहे? असं विचारलं होतं. दरम्यान, अशा घटनांमुळे संपूर्ण भारतीयांच्या प्रतिष्ठेला धक्का लागत असल्याची भावना सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त केली आहे.