चीनमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. याच दरम्यान, चीनमध्ये एका कपलला वाचवण्यासाठी गेले असता नेमकं काय़ घडलं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये ही घटना घडली, जिथे पावसाने कहर केला आणि अचानक पूर आला.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, एक पुरूष पुरात अडकला होता आणि तो रेस्क्यू टीमला त्याच्या पत्नीला वाचवण्याची विनंती करत आहे. पतीने रेस्क्यू टीमला सांगितलं की, आधी माझ्या पत्नीला वाचवा, तिला पोहता येत नाही. मी ठीक आहे, मला पोहता येतं, तुम्ही तिला आधी सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. यानंतर रेस्क्यू टीमने सर्वात आधी पत्नीला, नंतर तिच्या पतीला वाचवलं, त्यानंतर कपलला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.
पुरामध्ये जीव वाचल्यानंतर पती-पत्नीने आनंदाने एकमेकांना मिठी मारली. लियू असं या व्यक्तीचं नाव आहे. लियू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भयंकर परिस्थिती पाहून तो खूप घाबरला होता आणि पत्नी रडत होती कारण तिला पोहता येत नव्हतं, मनात सर्वात आधी पत्नीला वाचवायचाच विचार आला. पत्नीला वाचवल्याबद्दल लियू यांनी रेस्क्यू टीमचे आभार मानले.
हा व्हिडीओ रेडनोटसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. साधं जीवन जगणारं सुखी कुटुंब असं म्हणत लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. असा नवरा म्हणजे अनेक जन्मांचा आशीर्वाद असल्याचं युजर्स म्हणत आहेत. चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.