Gujarat Lion Video: तुम्ही आतापर्यंत घरात कुत्रा, मांजर, गाय, बैल, म्हैस शिरल्याचे ऐकले असेल. पण, जरा कल्पना करा की, तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसह घरी आरामात झोपला आहात अन् रात्रीच्या काळोखात अचानक घरात सिंह शिरला तर? नुसत्या कल्पनेने थरकाप उडेल, पण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. सिंह फक्त घरात शिरलाच नाही, तर चांगले दोन तास आरामही केला. ही धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सिंहाला पाहून लोक तंतरले...गुजराजच्या अमरेली जिल्ह्यात ही घटना घडली. सिंह घरात शिरल्याचे पाहून घरातील लोक थरथर कापू लागले. सुमारे दोन तास सिंह स्वयंपाकघरात ठाण मांडून बसला होता. सिंहाला पाहून घरातील लोकांनी पळ काढला. शेवटी आजूबाजूच्या लोकांनी आणि गावकऱ्यांनी या कुटुंबाला मदत केली. त्यांनी सिंहाच्या तोंडावर लाईट मारुन आणि मोठमोठ्याने आवाज करुन सिंहाला पळवून लावले. सिंह पळून गेल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सिंह घरात कसा शिरला?
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलुभाई रामभाई लखनोत्रा यांचे कुटुंब गुजरातमधील अमरेली येथे त्यांच्या घरात झोपले होते. यावेळी सिंह छतावरुन घरात घुसला. स्वयंपाक घरात काही आवाज झाल्याने कुटुंबीय जागे झाले, त्यांनी आत जाऊन पाहिले असता सिंह बसलेला दिसला. सिंहाला पाहून कुटुंबाने तात्काळ पळ काढला आणि गावकऱ्यांना माहिती दिली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिंह भिंतीवरुन किचनमध्ये डोकावताना दिसतोय, तर गावकरी त्याच्या चेहऱ्यावर टॉर्च लाइट मारताना दिसतात.
पाहा व्हिडिओ
सुदैवाने सिंह कोणालाही इजा न करता शांतपणे निघून गेला. दरम्यान, 'जंगलचा राजा' रहिवासी भागात दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. फेब्रुवारी महिन्यातच एक एशियाटिक सिंह रस्त्यावर फिरताना दिसल्याने भावनगर-सोमनाथ महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान 15 मिनिटे वाहने थांबली होती. याशिवाय गुजरातच्या गीरजवळील अनेक गावात रात्रीच्यावेळी सिंह फिरताना दिसतात.