सातारा : साताऱ्याचे वेगळेपण जगभरात पोहोचले आहे. साताऱ्याचा निसर्ग, सह्याद्रीची उंच डोंगररांग, थंड हवा, कृष्णा व कोयनेचे पाणी अन् महाबळेश्वर-वाईचे वेगळंपण जगभर पोहोचले आहे. त्यामध्ये आता सातारी गाण्याच्या ठसक्याची भर पडली आहे. चीन देशातील डान्स करणाऱ्या सुंदर मुलींनाही प्रेमात पाडलं आहे. त्यामुळे सातारी गाण्यावर चीनच्या मुली डान्स करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.सध्या भारत, चीन, अमेरिका व पाकिस्तान हे देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरून चर्चेत आहेत, पण कोणत्याही कलेला व गाण्याला देशाची व आंतरराष्ट्रीय सीमा नसते. हेच सातारी गाण्याने दाखवून दिले आहे. 'साताऱ्याची गुलछडी, मला रोखून पाहू नका.' या गाण्याची भुरळ थेट चीनमधील डान्स अकॅडमीतील मुलींना पडली आहे.
जगात भारी आपला सातारा..चीनमधील चेनगड्यू-चिना येथील एका डान्स अकॅडमीमध्ये एक प्रशिक्षक सातारी गाण्यावर चीनच्या मुलींचा डान्स बसवितानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे सातारी गाण्याची चीन देशात चांगलीच हवा.. असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या आहेत. त्यामध्ये 'जगात भारी आपला सातारा' ही प्रतिक्रिया आणखी बोलकी आहे.