"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:14 IST2025-05-19T17:14:31+5:302025-05-19T17:14:59+5:30
एका परदेशी व्लॉगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने एका मेहनती भारतीयाला भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे.

"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
भारत आपली संस्कृती, वारसा, सुंदर लोक आणि अतुलनीय आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. अनेक परदेशी व्लॉगर भारतात येतात आणि येथील अनोख्या गोष्टी पाहून आश्चर्यचकित होतात. एका परदेशी व्लॉगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने एका मेहनती भारतीयाला भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे. ही गोष्ट आहे एका कष्टाळू व्यक्तीची ज्याने आपल्या मेहनतीने सर्वांचं मन जिंकलं.
निक नावाच्या व्लॉगरने हा व्हिडीओ शेअर केला आहे."मला प्रेरणा मिळावी म्हणून मी प्रवास करतो. @shashisahana41ही व्यक्ती जगाला प्रेरणा देत आहे. एका उत्तम जीवनासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात आणि या व्यक्तीचे कठोर परिश्रम अतुलनीय आहेत. मी त्याच्याकडून प्रेरणा घेतो. आता मी आयुष्याला गृहीत धरणार नाही. धन्यवाद भाऊ."
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय" असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. निकची भेट शशीशी झाली, जो बंगळुरूमध्ये एक रिक्षा चालक आहे आणि तो दिव्यांग आहे. तरीसुद्धा शशी रिक्षा चालवतो आणि निकला शहरात फिरवून आणतो. शशीची मेहनत आणि धाडस पाहून निक भावुक झाला.
"तू खूप मजबूत आहेस. तुला आणखी बळ मिळो" असं म्हटलं आहे. शशीने कधीही त्याची कमजोरी त्याच्या मार्गात येऊ दिली नाही. तो कठोर परिश्रमाने आपल्या कुटुंबाची काळजी घेतो आणि आपलं काम करतो. त्याची गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि लोकांच्या मनाला स्पर्शून गेला.