Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:29 IST2025-11-02T17:21:56+5:302025-11-02T17:29:07+5:30
Ex-MLA Viral Video: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या माजी आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू असलेल्या हेल्मेट तपासणी मोहिमेदरम्यान माजी आमदार उमाशंकर मुंजारे यांचा राजकीय हस्तक्षेप फसला. हेल्मेट आणि वैध कागदपत्रे नसताना दुचाकी चालवल्याबद्दल पोलिसांनी त्यांना थांबवले असता, त्यांनी पोलिस अधीक्षकांसोबत वाद घातला. मात्र, रस्ते सुरक्षा नियमांनुसार पोलिसांनी त्यांना ₹२ हजार ३०० चा दंड ठोठावला आणि त्यांची दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात नेली. एसपी आणि माजी आमदार यांच्यातील या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी बालाघाट शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट तपासणी मोहीम सुरू केली. लोकांना हेल्मेट वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. माजी आमदार उमाशंकर मुंजारे हे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असताना पोलिसांनी त्यांची बाईक थांबवली. पोलिसांनी केवळ त्यांनाच का थांबवले, सर्वांना थांबवावे, असा त्यांनी पोलिसांकडे आग्रह धरला. मुंजारे यांची इच्छा होती की पोलिसांनी त्यांना कोणतीही कारवाई न करता जाऊ द्यावे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.
वाद वाढू लागताच, माजी आमदार मुंजारे यांनी पोलिस अधीक्षकांना सांगितले की, "मला कायदा शिकवू नका. मी माजी आमदार आहे. माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. माझी बाईक चोरीची आहे", असे ते म्हणाले. यावर पोलीस अधिकारी आदित्य मिश्रा यांनी त्यांना दुचाकीचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितले, पण मुंजारे यांच्याकडे हेल्मेट किंवा अन्य कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षक आदित्य मिश्रा यांच्या उपस्थितीत पोलिसांनी त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ₹२ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्यात आली.
कायदा सर्वांसाठी समान
माजी आमदार मुंजारे व्हिडिओमध्ये असे म्हणताना दिसत आहेत की, इतरांना न थांबवता फक्त त्यांनाच दंड ठोठावण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना एसपी आदित्य मिश्रा यांनी स्पष्ट केले की, रस्ते सुरक्षा नियम सर्वांसाठी समान आहेत. हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई केली जाईल, मग ती व्यक्ती मोठी असो वा लहान. हा संपूर्ण वाद आणि झालेली कारवाई सध्या बालाघाटमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.