पॉलिसबाजारच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. कुटुंबासाठी लाईफ इंश्योरन्स पॉलिसी कव्हरेजचा प्रचार केला आहे. मात्र त्यामधील असंवेदनशील कथानकावर आता प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. "संतापजनक, रणवीर अलाहाबादियापेक्षाही अत्यंत वाईट" असं म्हणत पॉलिसीबाजारच्या जाहिरातीवर टीकेची झोड उठवण्यात आली.
२३ फेब्रुवारी रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रसारित झालेल्या या टीव्ही जाहिरातीत एक महिलेला तिच्या दिवंगत पतीने कुटुंबासाठी टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदी न केल्यामुळे निराश झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. जाहिरातीत ती "मी शाळेची फी कशी भरू? घराचा खर्चही आहे. तुम्ही टर्म लाइफ इन्शुरन्स न घेताच निघून गेलात" असं म्हणताना दिसत आहे. जाहिरातीत तिच्या पतीचा मृत्यू झाला असून त्याच्या फोटोला हार घातलेला दिसत आहे.
जाहिरातीतील संदेश हा कुटुंबांसाठी आर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी होता. मात्र तर अनेक सोशल मीडिया युजर्सनी या जाहिरातीबद्दल तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. "एका पुरुषाचं नुकतंच निधन झालं आणि त्याची पत्नी पहिली गोष्ट काय करते तर टर्म इन्शुरन्स न घेतल्याबद्दल त्याला दोष देते? ही आर्थिक जागरूकता नाही, हे फक्त असंवेदनशील कथानक आहे" असं एका एक्स युजरने म्हटलं आहे.
एका युजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. "ही जाहिरात केवळ असंवेदनशीलच नाही तर संतापजनक देखील आहे. पॉलिसीबाजार आता तरी थोडे मोठे व्हा. ही जाहिरात काढा आणि एखादी चांगली जाहिरात लाँच करा." आणखी एका युजरने "पुरुषांचा आणि मानवतेचा अपमान. रणवीर अलाहबादियापेक्षाही अत्यंत वाईट" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. लाखो लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे.