तुम्ही रस्त्यावर, मंदिरात किंवा रेल्वे स्टेशनवर अनेक भिकारी पाहिले असतील, पण तुम्ही कधी ऑनलाईन भीक मागणारा पाहिला आहे का? हो, एक भिकारी आहे जो YouTube वर लाईव्ह होऊन भीक मागतो. गोविंद सूर्य असं या ऑनलाईन भिकाऱ्याचं नाव आहे. govindsurya360 नावाने त्याचं चॅनल असून त्याचे ५ लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.
आजपर्यंत, त्याने आपल्या चॅनलवर ३८,००० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत, ज्याला २६ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गोविंद सूर्य दररोज ३-४ तास लाईव्ह राहतो, त्याच्या स्क्रीनवर २-३ QR कोड टाकतो आणि पैसे मागतो. त्याच्या चॅनलच्या बायोमध्ये "एक दिवस मी नक्कीच माझं स्वतःचं घर बांधेन, मग कोणीही मला येथून निघून जाण्यास सांगणार नाही" असं म्हटलं आहे. तो कोणालाही फॉलो करत नाही.
गोविंदने अनेक व्हिडिओंमध्ये दाखवून दिलं आहे की, तो सुपरचॅटवरून दररोज १० हजारापर्यंत कमाई करतो. गोविंद सूर्य देखील त्याच्या संघर्षाची गोष्ट शेअर करतो. एका व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं आहे की, जेव्हा त्याच्याकडे २,३ वर्षे काम नव्हतं तेव्हा त्याचं आयुष्य खूप कठीण झालं होतं. "मी तरुण आहे, पण मी घरी बेरोजगार बसायचो. जेव्हा माझे वडील रात्री १२:३० वाजता कामावरून घरी परतायचे आणि आमची नजरानजर व्हायची तेव्हा मला खूप लाज वाटायची."
"या वयात माझ्या वडिलांना सायकलवरून घरी परतताना पाहणं माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे. म्हणूनच मी भीक मागतो" असंही त्याने म्हटलं आहे. त्याने त्याच्या वडिलांचा सायकलवरून घरी परततानाचा व्हिडीओ देखील शेअर केला. शिवाय, अनेक व्हिडिओंमध्ये तो लोकांना मदत करतानाही दिसतो. याचे असंख्य फॉलोअर्स असून तो त्यांच्या माध्यमातून चांगली कमाईही करतो. त्याच्या व्हिडीओवर विविध कमेंट्स देखील येत असतात.