सोशल मीडियावर आजकाल भेसळ केल्याचे अनेक भीतीदायक व्हिडीओ समोर येत आहेत. फळं पिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर हा हमखास केला जातो. मात्र आता नारळाचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने सर्वांनाच धडकी भरली आहे. ज्या नारळपाण्यावर आपण आरोग्य सुधारण्यासाठी विश्वास ठेवतो, त्यात चक्क इंजेक्शनद्वारे केमिकलची भेसळ केली जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनात एकच प्रश्न येतो की, आता फळं आणि नैसर्गिक पेय देखील शरीरासाठी घातक आहेत का? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कशा प्रकारे नारळामध्ये इंजेक्शनद्वारे एक द्रव पदार्थ टाकला जात आहे. अनेकदा नारळपाणी जास्त गोड करण्यासाठी किंवा ते बराच काळ टिकवून ठेवण्यासाठी अशा केमिकल्सचा आधार घेतला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या नारळाला आपण निसर्गाची सर्वात शुद्ध देणगी मानून पितो, त्यालाही या लोकांनी सोडलेलं नाही. वेगवेगळ्या फळांनंतर आता नारळपाण्यासोबत असं केलं जात हे पाहून हे स्पष्ट झालं आहे की, बाजारात विकली जाणारी प्रत्येक चमकणारी गोष्ट चांगली नसते.
आजच्या काळात सामान्यांची अशा प्रकारे फसवणूक होत आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते फळभाज्यांपर्यंत सर्वत्र भेसळ दिसत आहे. नफेखोरांनी जनतेच्या आरोग्याला चहूबाजूंनी घेरलं आहे. नारळासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फळामध्ये इंजेक्शनचा वापर हे सांगतो की, आता लोभाला कोणतीही सीमा राहिलेली नाही. सामान्य माणूस आपल्या कष्टाची कमाई आरोग्य टिकवण्यासाठी खर्च करतो, परंतु त्याबदल्यात त्याला हे असं 'विष' मिळत आहे.
हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने एक अतिशय कडवट सत्य मांडलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, अशा भेसळ करणाऱ्या लोकांवर अनेकदा कोणतीही मोठी कारवाई होत नाही, कारण त्यांचं नेटवर्क खूप मजबूत असते. उलट जे लोक या वाईट गोष्टींचा पर्दाफाश करतात, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.