अरेरे! "पत्नी नाराज होऊन माहेरी गेलीय, मन वळवून परत आणायचंय म्हणून सुट्टी हवी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:32 IST2022-08-04T13:26:39+5:302022-08-04T13:32:25+5:30
कानपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने एका उच्च अधिकाऱ्याला पत्र पाठवून आपल्या नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.

अरेरे! "पत्नी नाराज होऊन माहेरी गेलीय, मन वळवून परत आणायचंय म्हणून सुट्टी हवी"
पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत असतात. कधीकधी एकाचा राग शांत करण्यासाठी, दुसरा त्याचे मन वळवतो. विशेषत: पतीला पत्नीचा राग शांत करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कित्येकदा बायको रागाच्या भरात तिच्या माहेरच्या घरी जाते, मग नवरा तिची समजूत काढण्यासाठी तिच्या माहेरच्या घरी जातो आणि तिला बरोबर घेऊन येतो. अशा परिस्थितीत नोकरी करणाऱ्यांना, बायकोच्या माहेरी जाण्यासाठी, सुट्टी घेण्यासाठी आधी वरिष्ठांकडे रजेसाठी अर्ज करावा लागत आहे.
एका क्लार्कसोबत अशीच घटना घडली आहे. त्याने लिहिलेला सुट्टीचा अर्ज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कानपूरच्या एका सरकारी अधिकाऱ्याने एका उच्च अधिकाऱ्याला पत्र पाठवून आपल्या नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे. एका क्लार्कने लिहिलेला हा रजेचा अर्ज आता खूप व्हायरल होत आहे.
शमशाद अहमद याने प्रेम नगरच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) यांना पत्र लिहून त्यांना तात्काळ रजेची गरज का आहे हे स्पष्ट केले आहे. अहमदच्या म्हणण्यानुसार, त्याचा त्याच्या पत्नीशी वाद झाला, त्यानंतर ती मुलांना घेऊन तिच्या माहेरच्या घरी गेली. "मी दु:खी आहे. मला पत्नीची समजूत घालण्यासाठी, तिला परत आणण्यासाठी गावी जावे लागेल. कृपया माझ्या रजेचा अर्ज स्वीकारा" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.