Chandrayaan-3 : भारत जगात भारी! पृथ्वी मातेने अनोख्या अंदाजात चांदोमामाला बांधली राखी; फोटो तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:25 PM2023-08-24T13:25:05+5:302023-08-24T13:48:51+5:30
Chandrayaan-3 : चंद्रयान-३ हॅशटॅग वापरून एका युजरने ट्विटरवर एक छानसा फोटो शेअर केला आहे.
भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर सत्यात उतरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने मोठे यश मिळवले. चांद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरलं आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यातील एका खास फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
चंद्रयान-३ हॅशटॅग वापरून एका युजरने ट्विटरवर एक छानसा फोटो शेअर केला आहे. यामध्ये पृथ्वी चंद्राला राखी बांधत आहे, ज्या चंद्राला भारतीय लोक प्रेमाने मामा म्हणतात. हे मनमोहक चित्र इंटरनेटवर तुफान व्हायरल झालं आहे. एका युजरने "अरे, हे खूपच छान आहे. पृथ्वी चंद्राला राखी बांधत आहे." असं म्हटलं आहे. तर एकाने चांदो मामा, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा असं म्हटलं. आपला देश सर्वात महान आहे आणि याचे कारण म्हणजे आपण केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण पृथ्वीला माता म्हणतो आणि म्हणूनच चंद्राला आपला मामा म्हणतो असंही एकाने म्हटलं आहे.
awwwww this is so cute😘
— ❤️HONESTU❤️ (@honestuuuu) August 23, 2023
Earth is tieing rakhi to Moon #RakshaBandhan#VikramLander#Chandrayaan3pic.twitter.com/3FeOQKFc4w
२०१९ साली भारताच्या चंद्रयान-२ या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चंद्रयान-३ मोहिमेची आखणी केली होती. दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते.
अखेर ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.
चंद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह इस्रोच्या संशोधकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याकडे पृथ्वीला आई तर चंद्राला मामा म्हटलं जातं. तर ‘चंदामामा दूर के’ हा वाकप्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र आता तो बदलून चंदामामा टूक के असं म्हणावं लागेल, अशा शब्दात या यशाचा आनंद व्यक्त केला. तसेच पुढच्या काळात भारत गगनयान, आदित्य-१ या मोहिमांसह शुक्र ग्रहावरील मोहिमांचेही सुतोवाच केले.