Mumbai Rapido Rider Social Viral News: प्रत्येकाला प्रवास करताना काही ना काही अनुभव येत असतात. काही अनुभव थक्क करणारे असतात, तर काही अनुभव कुणाच्याच वाट्याला येऊ नये, असे वाटते. काही अनुभवातून दुःख होते, तर काही अनुभवातून आयुष्यभराची प्रेरणा मिळते. असाच प्रेरणादायी अनुभव मुंबईतील एका महिलेला आला. रॅपिडोने घरी जात असताना त्या चालकाचा किस्सा ऐकून ती प्रवासी महिला थक्कच झाली. हा अनुभव तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
या व्हायरल पोस्टमध्ये,या महिलेने संपूर्ण किस्सा सांगत, ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे म्हटले आहे. यावर अनेक लोक प्रतिक्रिया देत असून, हा अनुभव लोकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच ही बाब सामान्य असल्याची प्रतिक्रिया अनेक युझरनी दिली आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये महिला म्हणते की, मी २५ वर्षांची आहे आणि सध्या एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते. माझे ऑफिस मुंबईतील नरिमन पॉइंट येथे आहे. मी ऑफिसमधून बाहेर पडले, तेव्हा उशीर झाला होता. मला पिकअप करायला येणारी महिला दुसऱ्या पिक अँड ड्रॉपमुळे आली नाही. अशा परिस्थितीत अनेक टॅक्सी चालकांनी इच्छित स्थळी जाण्यास नकार दिला, तेव्हा मी रॅपिडो बुक केली.
ऑफिसचे काम पूर्ण केल्यानंतर रॅपिडोमध्ये काम करता
पुढे ती महिला लिहिते की, १० मिनिटांनी माझी रॅपिडो राइड कन्फर्म झाली आणि रायडर आला. ओटीपी दिल्यानंतर, राइड नेहमीप्रमाणे सुरू झाली. जेव्हा मी पहिल्या नजरेत रायडरला पाहिले, तेव्हा मला त्यांचे व्यक्तिमत्व खूप आवडले. राइड सुरू झाल्यानंतर, मला माझ्या मॅनेजरचा फोन आला, म्हणून मी त्याच्याशी बोलले. रायडरने आमचा संवाद ऐकला. कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर, त्याने विचारले की, तुम्ही इथे काम करता का? मी उत्तरले की, हो आणि त्याला इमारतीचे नावही सांगितले. ज्याच्या उत्तरात रॅपिडो रायडरने सांगितले की, तो त्याच इमारतीतील डीबीएस बँकेत काम करतो. ती महिला पुढे लिहिते की, ती एक अतिशय प्रतिष्ठित बँक आहे, म्हणून मी त्याला विचारले की, तर तुम्ही तुमचे ऑफिसचे काम पूर्ण केल्यानंतर रॅपिडोमध्ये काम करता, यावर त्याने होकारार्थी उत्तर दिले.
प्रेरणा मिळाली आणि हा किस्सा शेअर करावासा वाटला
तो एक सज्जन माणूस होता. म्हणून मी त्याला ५ स्टार रेटिंग दिले. त्याचे व्यक्तिमत्व उत्तम होते, तो उंच होता, केस छान होते, या सर्व गोष्टी त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी होत्या! त्याला त्याच्या कामाची अजिबात लाज वाटत नव्हती, बँकेत काम करणारा रॅपिडो कसा चालवू शकतो, असा मला प्रश्न पडला होता. पण आता मला त्याच्याकडून इतकी प्रेरणा मिळाली आहे की, त्याला मी विसरू शकत नाही. हा किस्सा अद्भूत असल्यामुळे शेअर करावासा वाटला.
दरम्यान, 'बँक कर्मचारी रॅपिडो कॅप्टन!' या टायटलसह ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. शेकडो युझरनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. डीबीएस बँकेत काम केल्यानंतर रॅपिडो चालवणाऱ्या व्यक्तीबद्दल अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, मी रॅपिडो बाइक खूप वापरतो. कारण ती ऑटोपेक्षा स्वस्त आणि सोयीस्कर आहे. अनेकवेळा रॅपिडो कॅप्टन मला रॉयल एनफिल्ड आणि इतर स्पोर्ट्स बाइकवरून घेण्यासाठी आला आहे. दुसऱ्याने म्हटले की हो, हे सामान्य आहे आणि लाज वाटण्यासारखे काही नाही. बरेच लोक अतिरिक्त कमाईसाठी रॅपिडो चालवतात. बहुतेक लोक असे करतात. कारण पेट्रोलचा खर्च भागवता येतो.