‘AI’नं जिंकून दिली दीड कोटींची लॉटरी; महिलेने चक्क चॅटजीपीटीचा केला वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 06:44 IST2025-09-26T06:43:38+5:302025-09-26T06:44:04+5:30
एका असाध्य आजारामुळे कॅरीच्या पतीचं २०२४मध्ये निधन झालं. या आजारावर संशोधन करणाऱ्या Association for Frontotemporal Degeneration (AFTD) या संस्थेला बक्षिसातली काही रक्कम ती देणार आहे

‘AI’नं जिंकून दिली दीड कोटींची लॉटरी; महिलेने चक्क चॅटजीपीटीचा केला वापर
आजकाल आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण ‘एआय’, चॅटजीपीटीचा वापर करतो आणि आपली दैनंदिन कामं सुलभ करतो. पण चॅटजीपीटीचा वापर कुणी, कशासाठी करावा? अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील कॅरी एडवर्ड्स या महिलेनं चॅटजीपीटीचा वापर चक्क लॉटरीचं तिकीट काढण्यासाठी केला. तिनं सहज म्हणून चॅटजीपीटीला सांगितलं, माझ्यासाठी लॉटरीचा नंबर निवडून दे. चॅटजीपीटीनं सांगितल्याप्रमाणे तिनं लाॅटरीच्या तिकिटाचा नंबर निवडला आणि ते तिकीट खरेदी केलं. योगायाेगानं तिच्या तिकिटाला बक्षीस लागलं.
चॅटजीपीटीनं दिलेल्या नंबरांपैकी चार मुख्य नंबर आणि पाॅवर-बॉल नंबर बरोबर निघाले, ज्यामुळं तिला ५०,००० डॉलरचं बक्षीस लागलं. पण तिनं एक डॉलरच्या पॉवर प्लेचं ऑप्शन निवडलं होतं, त्यामुळे तिच्या बक्षिसाची रक्कम तिप्पट होऊन दीड लाख डॉलर्स (सुमारे १.३२ कोटी रुपये) झाली. दोन दिवसांनी तिला मोबाइलवर एक नोटिफिकेशन आलं, ज्यात तिला बक्षीस मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. हा फसवणुकीचा प्रकार आहे, असं वाटल्यानं सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं. कॅरी म्हणते, मी कधीच जिंकणार नाही, हे मला माहीत होतं, याआधीही काही वेळा मी लाॅटरीचं तिकीट घेतलं होतं; पण एकदाही मला कुठलीही लॉटरी लागली नव्हती. पण खात्री केल्यावर तिला समजलं की चॅटजीपीटीनं सुचवलेल्या नंबरांमुळे तिला भलं मोठं बक्षीस लागलं होतं. कॅरीनं पुन्हा पुन्हा स्वत:ला चिमटे घेऊन बघितलं आणि तिकीट पुन्हा पुन्हा तपासलं, की आपल्याला खरोखरच दीड लाख डॉलर्सची लॉटरी लागली आहे का ते ! पण ते शंभर टक्के खरं होतं. पण कॅरीची गोष्ट यापुढे सुरू होते. या बक्षिसाला तिनं ईश्वराचा आशीर्वाद मानलं आणि ही सगळी रक्कम चांगलं काम करणाऱ्या संस्थांना दान करायचं ठरवलं आहे. ही रक्कम तीन चॅरिटी संस्थांना ती मदत म्हणून देणार आहे.
एका असाध्य आजारामुळे कॅरीच्या पतीचं २०२४मध्ये निधन झालं. या आजारावर संशोधन करणाऱ्या Association for Frontotemporal Degeneration (AFTD) या संस्थेला बक्षिसातली काही रक्कम ती देणार आहे. दुसरी संस्था आहे शालोम फार्म्स. शाश्वत शेती आणि अन्न समतेसाठी काम करणारी ही संस्था अन्नाची कमतरता दूर करण्याचाही प्रयत्न करते. तिसरी संस्था आहे नेव्ही-मरीन काॅर्प्स रिलिफ सोसायटी. ही संस्था आपले सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीच्या काळात मदत करते. लॉटरीत मिळालेले सर्व पैसे कॅरी या तिन्ही संस्थांना दान करणार आहे.
कॅरीचं म्हणणं आहे, या पैशांवर माझा काहीही अधिकार नव्हता. केवळ नशिबानंच मला ही लॉटरी लागली. त्यामुळे हे पैसे गरजवंतांना, ज्यांना खरोखरच पैशाची निकड आहे, त्यांनाच मिळावेत अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिक फायद्यापेक्षा आपण इतरांच्या काहीतरी उपयोगी पडावं, असं मला कायम वाटत होतं, या लाॅटरीच्या मदतीनं माझं हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मी काही फार मोठी गोष्ट केली नाही किंवा करत नाहीए; पण इतरांनीही यापासून प्रेरणा घ्यावी आणि गरजूंच्या मदतीसाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं.. कॅरीच्या निमित्तानं ‘एआय’ आणि पैसा यांच्यातल्या संबंधाविषयी नवी चर्चा सुरू झाली आहे, हे मात्र खरं!..