आग्रा कँट रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात ही महिला प्लॅटफॉर्मवर पडली. ट्रेनमध्ये आपलं बाळ एकटं असल्याचं पाहून महिला प्रचंड घाबरली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोनदा पडूनही ती तिसऱ्या प्रयत्नात अखेर ट्रेनमध्ये चढण्यात यशस्वी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला प्लॅटफॉर्मवर पाणी घेण्यासाठी उतरली होती, परंतु अचानक ट्रेन सुरू झाली. ट्रेनमध्ये तिचं लहान बाळ एकटंच असल्याने तिची चांगलीच तारांबळ उडाली. घाबरलेल्या अवस्थेत ती धावत्या ट्रेनचं हँडल पकडण्याचा प्रयत्न करू लागली.
पहिल्या प्रयत्नात पाय घसरल्याने ती खाली पडली, तर दुसऱ्यांदा पुन्हा हँडल सुटल्याने ती प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली. सुदैवाने ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये गेली नाही. अखेर हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात ही महिला कशीबशी चालत्या ट्रेनमध्ये चढण्यात यशस्वी झाली.
धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उपस्थित होते, मात्र कोणीही त्या महिलेला वाचवण्यासाठी किंवा ट्रेनची चेन ओढण्यासाठी पुढे आलं नाही. लोक केवळ उभे राहून व्हिडीओ बनवण्यात मग्न होते.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी हा मोठा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं आहे. रेल्वेने प्रवाशांना सल्ला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन केलं आहे. जर तुमचं सामान किंवा नातेवाईक ट्रेनमध्ये असतील, तर त्वरित स्टेशन मास्तर किंवा आरपीएफला (RPF) कळवा. अशी घाई तुमच्या जीवावर बेतू शकते असं म्हटलं आहे.