हे सोशल मीडियाचं युग आहे, इथं कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अनोख्या गोष्टी केल्यानं प्रसिद्धी मिळते किंबहुना याच उद्देशानं बहुतांश जण काही ना काही भन्नाट कल्पना शोधत असतात. असाच काहीसा प्रकार राजस्थानमधील दौसा येथील युवकाच्या बाबतीत घडला आहे. या तरूणानं लग्नासाठी थेट तहसीलदाराला पत्र लिहून सर्वांचे लक्ष वेधलं. याशिवाय या समस्येचं तहसीलदारानं समाधान करायला हवं, असं त्यानं म्हटलं.
'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' ही उपाधी लागू होत असलेल्या या तरूणाचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "माझ्याकडून घरातील काम होत नाहीत, त्यामुळं मला पत्नीची आवश्यकता आहे", असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
तरूणाची भन्नाट मागणी तरूणाच्या मागणीनुसार त्याला अशी पत्नी हवी आहे, जिच्यामध्ये चार गुण असतील. पहिला म्हणजे ती सडपातळ असावी, गोरी असावी, ३० ते ४० या वयोगटातील असावी आणि तिला घरातील सर्व कामं देखील यायला हवीत. तरूणाच्या म्हणण्यानुसार, तो घरात एकटा असतो त्यामुळे त्रासला आहे.