Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:28 IST2025-12-19T16:26:02+5:302025-12-19T16:28:30+5:30
Bengaluru Viral Video: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली.

Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. त्यागराजनगर परिसरात आपल्या आजीच्या घराबाहेर खेळत असलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलाला शेजाऱ्याने कोणतीही चूक नसताना पाठीमागून जोरात लाथ मारली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मुलाच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ಮಗು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ದಿಡೀರ್ ಅಂತ ಬಂದ ವ್ಯಕ್ತಿ ಮಗುವಿಗೆ ಒದ್ದ ದೃಶ್ಯ ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲಿ ಸೆರೆ. #bangalorepic.twitter.com/ELARsnoSqh
— pragathi shetty (@pragathishett25) December 19, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. पीडित मुलगा त्याच्या आजीच्या घराबाहेर इतर मुलांसोबत बॅडमिंटन खेळण्यात दंग होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मुले शांतपणे खेळत असताना शेजारी राहणारा रंजन नावाचा तरुण अचानक घराबाहेर येतो आणि धावत जाऊन खेळणाऱ्या पाच वर्षांच्या मुलाच्या पाठीत जोरात लाथ मारतो, यात मुलगा दूर फेकला गेला, त्यानंतर आरोपी शांतपणे पुढे निघून जातो.
आरोपीने मारलेल्या या लाथेमुळे मुलगा जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच त्याच्या हात-पायांनाही मोठ्या प्रमाणात ओरखडे आले आहेत. या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली. मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रंजन हा सराईत गुन्हेगार असून तो परिसरात नेहमीच लोकांना मारहाण किंवा शिवीगाळ करत असतो. त्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या घटनेनंतर मुलाच्या पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.
सुरुवातीला पोलिसांनी केवळ ताकीद देऊन आरोपीला सोडून दिले. मात्र, घटनेचे गांभीर्य आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी आरोपी रंजनला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितच्या कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.