महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:25 IST2025-09-23T10:24:59+5:302025-09-23T10:25:22+5:30
एका महिलेसह काही नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली

महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
मुंबई - दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात महिला उपनिरीक्षक आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोघांमधील वादाने पोलिस ठाणे डोक्यावर घेतले. रागाच्या भरात महिला उपनिरीक्षकाने वर्दीवरील नावाचा बॅज तक्रारदाराला फेकून मारला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी गिरगाव येथील व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात घडली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल घेत, गिरगाव विभागाचे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) यांना चौकशीचे आदेश दिल्याचे पोलिस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले.
एका महिलेसह काही नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला उपनिरीक्षक यांच्यासोबत त्यांची वादावादी झाली. या वादात महिला अधिकाऱ्यांनी आपल्या गणवेशावरील नावाची प्लेट काढून उपस्थितांवर फेकल्याचे व्हिडीओत दिसून येते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. पुढे हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
अर्धवट व्हिडीओ अपलोड
व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात घडलेल्या राड्याची दुसरी बाजू समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शीच्या आरोपानंतर एका व्यक्तीने पोलिस कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी पोलिस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीसह सोबत असलेल्या महिलेने आरडाओरड करत थेट अधिकाऱ्यांवर आरोप केले. व्हिडीओ रेकॉर्ड करताना त्या व्यक्तीने थेट अधिकाऱ्याच्या बॅजवर कॅमेरा नेला आणि त्यांच्यावर दबाव आणल्याने खर्डे यांनी आपली नेमप्लेट भिंतीकडे भिरकावली. या प्रकरणाचा अर्धवट व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.
पोलिसांवर खोटे आरोप?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने आधी कार्यालयाचा दरवाजा तोडून शिवीगाळ केली. कारवाई टाळण्यासाठी त्यांनी पोलिसांवर खोटे आरोप करत गोंधळ घातला. पगाराचे पैसे बाकी असलेल्या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी नोंद केली असूनही, संबंधितांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धमकी देत तक्रार दाखल होऊ नये, यासाठी दबाव टाकला.