होमवर्क न करता TV बघत बसला मुलगा; आई वडिलांनी दिलेली शिक्षा पाहून सर्वच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 17:47 IST2022-11-25T17:46:46+5:302022-11-25T17:47:14+5:30
मुलांच्या पालन-पोषणावरून सोशल मीडियात वाद रंगलाय. त्यात काहीजण मुलाला दिलेल्या शिक्षेवरून ही खूप क्रूर शिक्षा आहे. त्याला समजवण्याचे अन्य पर्यायही होते असं म्हणत आहेत.

होमवर्क न करता TV बघत बसला मुलगा; आई वडिलांनी दिलेली शिक्षा पाहून सर्वच हैराण
घरातून निघताना आई वडिलांनी त्यांच्या ८ वर्षीय मुलाला स्कूलनं दिलेला होमवर्क करण्यास सांगितले. परंतु जेव्हा आई वडील घरी आले तेव्हा मुलगा सोफ्यावर बसून टीव्ही पाहताना दिसला. त्याने होमवर्कही केला नव्हता. मुलाच्या या वर्तवणुकीवर संतापलेल्या आई वडिलांनी मुलाला कठोर शिक्षा दिली. जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. सोशल मीडियावर सध्या ही घटना व्हायरल होत आहे. त्यावर नेटिझन्स या जोडप्यावर हल्लोबाल करत आहेत.
मुलांच्या पालन-पोषणावरून सोशल मीडियात वाद रंगलाय. त्यात काहीजण मुलाला दिलेल्या शिक्षेवरून ही खूप क्रूर शिक्षा आहे. त्याला समजवण्याचे अन्य पर्यायही होते असं म्हणत आहेत. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनच्या हुनान प्रांतातील हे प्रकरण आहे. जिथे आई वडिलांनी त्यांच्या मुलाला रात्रभर टीव्ही पाहण्याची सक्ती केली. होमवर्क पूर्ण न करता मुलगा टीव्ही पाहताना दिसल्यानं रागाच्या भरात त्याला रात्रभर झोपू दिले नाही. इतकेच नाही तर दोघेही एकापाठोपाठ एक या मुलावर लक्ष ठेवून होते. जेणेकरून मुलाला झोप मिळणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, जोडप्याने पहाटे ५ वाजेपर्यंत मुलाला झोपू दिले नाही. मुलगा सुरुवातीला शांत बसला होता. त्यानंतर हळूहळू त्याच्या डोळ्यावर झापड येत होती. जेव्हा झोप आवरली नाही तेव्हा तो रडायला लागला. त्याचे डोळे लाल झाले होते. चीनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर या घटनेवरून नेटिझन्सनं आई वडिलांवर टीका केली आहे. ही शिक्षा खूप कठोर आहे. मुलाने होमवर्क केला नाही आणि टीव्ही पाहत होता तर इतकं काय झालं? मुलाला समजावू शकत होते असं त्यांनी म्हटलं. या प्रकारच्या पालकत्वामुळे चीनमधील कायदेकर्त्यांना शिक्षणाच्या प्रचारासाठी कायदा आणण्याची प्रेरणा मिळाली. त्याअंतर्गत जर कोणी पालकाने मुलांशी गैरवर्तन केले तर त्यांना फटकारले जाऊ शकते. याशिवाय, ते आपल्या मुलांवर काहीही लादू शकत नाहीत या कारणास्तवही कायदा त्यांना प्रतिबंधित करेल.