No Shopkeeper Tea Stall: सोशल मीडियावर बरेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे आहेत की, जे वेगवेगळ्या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग माहीत व्हिडिओद्वारे लोकांना देतात. अनेक गोष्टी तर अशा असतात ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं आणि ज्या अवाक् करतात. तुम्ही पाहिलं असेल तर भारतात चहाच्या ठेल्यांची काही कमतरता नाही. जागोजागी चहाचे स्टॉल बघायला मिळतात. या स्टॉल्सवर लोक येतात, बसतात आणि चहा पितात. पण भारतात एक असं टी-स्टॉल आहे हे १०० पेक्षा जास्त वर्ष जुनं आहे. या टी-स्टॉलची खासियत म्हणजे या स्टॉलची सुरूवात स्वतंत्रता सेनानी आणि ब्रूक बॉन्ड कंपनीसाठी काम केलेले नरेश चंद्रा शोम यांनी केली होती. याची आणखी एक खासियत म्हणजे १०० वर्षापासून या टी-स्टॉलमध्ये दुकानदार बसत नाही. तरी सुद्धा हे टी-स्टॉल सुरू आहे.
ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आराधनानं या खास टी-स्टॉलची माहिती देणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात आराधना या टी-स्टॉलवर काही लोकांसोबत चहा पिताना दिसत आहे. हे टी-स्टॉल पश्चिम बंगालच्या श्रीरामपूरमध्ये आहे. येथील चतरा काली बाबू स्मशनाभूमीसमोर हा टी-स्टॉल आहे. आराधनानं सांगितलं की, हा टी-स्टॉल १०० पेक्षा अधिक वर्षांपासून सुरू आहे. सकाळी दुकानाचा मालक येतो आणि दुकान उघडून घरी निघून जातो. इथे येणारे ग्राहक स्वत: चहा बनवतात आणि पितात. आणखी एक खास बाब म्हणजे सगळे ग्राहक गल्ल्यात चहाचे पैसे टाकून जातात.
या अनोख्या टी-स्टॉलबाबत जाणून घेऊन लोक अवाक् झाले आहेत. तसेच व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, 'मी या टी-स्टॉलवर नक्की जाणार'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'हा टी-स्टॉल इमानदारीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे'. तर तिसऱ्यानं लिहिलं की, 'हे तर चमत्कारापेक्षा कमी नाही'. चौथ्यानं लिहिलं की, 'लोकांच्या विश्वासाचं आणि इमानदारीचं बेस्ट उदाहरण'.