तरूणांचा स्वयंरोजगाराचा मंत्र
By Admin | Updated: November 12, 2014 22:52 IST2014-11-12T21:32:00+5:302014-11-12T22:52:46+5:30
भेडशीतील युवक : झेंडूच्या मळ्यातून कमावले दीड लाख रूपये

तरूणांचा स्वयंरोजगाराचा मंत्र
शिरीष नाईक - दोडामार्गशिक्षण करून नोकरीच मिळाली पाहिजे, असा अट्टाहास करणारे आजचे तरुण युवक ! नोकरी नाही मिळाली, तर घरीच बसून दिवस, वर्षे घालवितात. त्याउलट नोकरीच्या पाठीमागे न धावता काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात बाळगून एक उत्तम शेतकरी व उद्योजक होऊन दाखविण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील तीन युवकांच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा विचार येताच त्यांनी एका शेतकऱ्याकडून पाच गुंठे जमीन करार पद्धतीने घेऊन त्यामध्ये त्यांनी लुपिन फाऊंडेशन संस्थेकडून अडीच हजार झेंडूची झाडे तीन रुपये दराने खरेदी केली आणि त्यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यात त्या चार गुंठ्यातून दीड लाखाचे उत्पादन घेतले.
अजूनही ते युवक संध्याकाळच्यावेळी मळ्यात जाऊन कष्ट, मेहनत घेतात. एकीकडे काहीतरी वेगळे करण्याची जिद्दद मनात ठेवून हे करायचं आहे, असे त्यांना मनोमन वाटते. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी गावातील हे युवक आहेत. त्यांची नावे गणपत ज्ञानेश्वर डांगी, राया अरुण भणगे आणि व्यंकटेश गवस. पैकी डांगी आणि भणगे हे सकाळच्या वेळेत मुलांना गोवा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शिकवतात. तर व्यंकटेश गवस हे येथीलच शाळेत शिकवायला जातो. या तिघांशी चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले, आम्ही सकाळच्यावेळी शाळेत शिकवायला जातो. समाजात करण्यासारखे खूप काही असते. पण त्याच्याकडे नीट डोळे उघडून पाहत नाही.
त्यामुळे स्पर्धेच्या युगात मागे आहोत. घाटमाथ्यावरच्या तरुणांचा विचार केला, तर जे मिळेत ते काम करतात आणि स्पर्धेत टिकतात. आमची मुले फार हुशार असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ती मागे राहतात. अशा निराश होऊन घरी बसणाऱ्या तरुणांना प्रेरणा आणि दिशा देण्यासाठी झेंडूचा मळा उभारला आहे. याची प्रेरणा घेऊन बेरोजगार तरुणांनी जमिनीत पीक घ्यावे, अशी इच्छा आहे. यातूनच काही पैसे त्यांना मिळतील. त्याचा वापर त्यांना पुढील शिक्षणासाठी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी गणपत डांगी म्हणाले, मी सुशिक्षित बेरोजगार होतो. सकाळी शिवाजी हायस्कूल येथे ज्ञानदानाचे काम करतो. संध्याकाळी मित्रांबरोबर मळ्यात काम करतो. माझे म्हणणे एवढेच आहे की, जी मुले घरी बसतात, त्यांनी आपल्या जमिनीत थोडी तरी मेहनत घेऊन अशी झेंडूची झाडे लावली, तरी ते स्वत:च्या पायावर उभे राहतील. त्यामुळे त्यांच्या मानसिक विचारांमध्ये बदल होईल. जर अशा मुलांना जर झेंडूची रोपे पाहिजेत, तर आम्ही उपलब्ध करून देऊ. कृषी विभागाच्याही काही योजना असतात. त्याही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पण हे सर्व करण्यासाठी मेहनत, जिद्द, कष्ट, आत्मविश्वास या गोष्टी आवश्यक आहेत. या गोष्टी असतील, तर कोणताही तरुण मागे राहणार नाही, याची मी खात्री देतो.
दखल घेत नाही
भारत देश हा तरुणांचा देश आहे. तरुण युवकाने घरी बसण्यापेक्षा आपली जमीन अशा शेतीखाली आणावी. त्याचबरोबर दोडामार्ग तिलारी धरणाखाली येणारे क्षेत्र आहे.याचे कुठे तरी नियोजन होणे आवश्यक आहे.
प्रेरणा देणारे काम
सुशिक्षित बेरोजगारांसाठी या तिन्ही युवकांनी पे्रेरणा घेण्यासारखे काम केले आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार कसा करता, यावर तुमचे जीवन अवलंबून असते. तालुक्यासाठी युवकाने असे जर काम केले, तर कोणीच बेकार राहू शकत नाही. यांचा आदर्श तालुक्यातील युवकांनी घ्यावा. यात काहीच वावगे नाही.
तिलारीच्या पाण्याचे नियोजन
तिलारी कालव्याचे पाणी तालुक्यातील प्रत्येक गावात कसे नेता येईल, याचा विचार लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी करावा.