गावातच युवकांनी रोजगार निर्माण करावा
By Admin | Updated: December 27, 2014 00:04 IST2014-12-26T21:18:03+5:302014-12-27T00:04:20+5:30
राजेंद्र मुंबरकर : वागदे येथे श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन

गावातच युवकांनी रोजगार निर्माण करावा
कणकवली : आप्पासाहेब पटवर्धन यांनी जात-पात न मानता सर्वांना एकत्र करून त्यांच्यामध्ये मिळून मिसळून काम केले. त्यामुळे समाजातील जाती-धर्माची दरी कमी होते. आज लोक समाजाकडे पाठ फिरविताना आढळून येतात. युवकांनी शहराचा रस्ता न धरता आपल्याच गावामध्ये रोजगार निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.
कणकवली कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर गोपुरी आश्रम वागदे येथे संपन्न होत आहे. त्यामध्ये गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी ‘गोपुरीचा वारसा’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यावेळी मुंबरकर बोलत होते. या व्याख्यानाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी स्वयंसेवकांना उद्बोधन करताना राजेंद्र मुंबरकर म्हणाले, गोपुरी हे एक माळरान होते. तेथे आप्पासाहेब पटवर्धन यांनी नंदनवन फुलविले. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी खेड्यामध्ये येऊन समाजाची सेवा केली. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात स्वच्छता, शौचालय तयार करणे, कातडी कमावणे, अस्पृश्यता निवारण, आदींपासून केली. मेलेली जनावरे ही देशाची संपत्ती आहे, असे त्यांनी पटवून दिले. घराचे शौचालय, गोबर गॅस हे प्रयोग आप्पांनी सुरू केले आणि ते यशस्वी केले. शेती, शेतीपूरक व्यवसाय, गोधन, आदींना त्यांनी प्राधान्य दिले. म्हणून आप्पा त्यांच्या कर्तृत्वाने एक अवलिया ठरले. त्यांनी आपल्या कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही, असे ते म्हणाले.
यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख
प्रा. डॉ. खंडेराव कोतवाल, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रा. बाळासाहेब राठोड, प्रा. सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील
१२० स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या. पूजा चव्हाण हिने प्रास्ताविक केले. सृष्टी तावडे हिने आभार मानले. (प्रतिनिधी)
गोपुरी आश्रमाद्वारे दिलेल्या प्रशिक्षणातून आज जिल्ह्यामध्ये २५० लहान काजू उद्योग किंवा संस्था आहेत, असे भरीव कार्य गोपुरीचे आहे. आप्पासाहेबांचे विचार व प्रेरणा घेऊन तुम्ही समाजात मिसळण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही सर्वजण स्वयंसेवक बुद्धिवान आहात. या बुद्धीला योग्य न्याय द्या, अशा शिबिरांद्वारे सामाजिक बांधीलकीचा वसा घेऊन जा व आपल्या गावामध्ये, शेतीमध्ये प्रयोग करून विविध सामाजिक उपक्रमांना मदत करा.