जीवनमान उंचावण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी
By Admin | Updated: January 28, 2015 00:56 IST2015-01-27T21:17:52+5:302015-01-28T00:56:47+5:30
जीवन कांबळे : देवगड महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रम

जीवनमान उंचावण्यासाठी आपली भूमिका पार पाडावी
पुरळ : विद्यार्थ्यांनी केवळ आपले ध्येय पूर्ण करण्यापर्यंत मर्यादित न राहता देशाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार जीवन कांबळे यांनी केले.देवगड महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. आॅक्टोबर २०१३ व मार्च २०१४ मध्ये कला, वाणिज्य व शास्त्र शाखेतून उत्तीर्ण झालेल्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यापीठ पदवी दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात एकाच दिवशी पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम केळकर महाविद्यालयात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवगड तहसीलदार जीवन कांबळे उपस्थित होते. शिक्षण विकास मंडळाच्या सभापती तृप्ती पारकर, कार्यवाह प्रसाद पारकर, उपाध्यक्ष अण्णा करंदीकर, सदस्य सृष्टी महाडिक, प्राचार्य भारत भोसले, सर्व शाखांचे समन्वयक प्रा. एम. व्ही. पाटील व डॉ. तरुजा भोसले, आदी उपस्थित होते.तहसीलदार जीवन कांबळे म्हणाले, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून, त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे. देवगडसारख्या डोंगरी भागात केळकर महाविद्यालयाने शैक्षणिक भरारी मारली असून विद्यार्थी अत्यंत प्रगतशील आहेत. त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले असले तरी आपल्या या यशात समाजाचा वाटा असतो. यामुळे आपले सामाजिक उत्तरदायित्व आपण विसरता कामा नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. भारत भोसले यांनी येथील विद्यार्थी आणि पालकवर्गाला हा पदवीदान दीक्षांत सोहळा प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. हे या विद्यार्थ्यांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तरुजा भोसले व आभार प्रा. एम. व्ही. पाटील यांनी मानले. (वार्ताहर)