You become the father of Shiv Sena's dissatisfaction! | शिवसैनिकांच्या असंतोषाचे जनक तुम्ही बना !

शिवसैनिकांच्या असंतोषाचे जनक तुम्ही बना !

ठळक मुद्देशिवसैनिकांच्या असंतोषाचे जनक तुम्ही बना !प्रमोद जठारांचे दीपक केसरकरांना आवाहन

कणकवली : अनेक कारणांमुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या असंतोषाचे जनक नेत्यांवर नाराज असलेल्या दीपक केसरकरांनी बनावे. असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच राज्यातील शिवसेना व महाविकास आघाडी सरकारची स्थिती सध्या पाहिली तर सर्वत्र अविश्वासाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दीपक केसरकर व वैभव नाईक यांच्यावर विश्वास नसल्याने उदय सामंत यांना मंत्री बनवून पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर दिली आहे.

' चांदा ते बांदा ' योजना बंद झाली तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे सांगणाऱ्या दीपक केसरकर यांनी आता खरोखरच राजीनामा द्यावा आणि भाजपात यावे. भाजप त्यांना बहुमताने निवडून आणेल. असे खुले आवतण जठार यांनी केसरकर यांना यावेळी दिले.

कणकवली येथील भाजप कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक शिशिर परुळेकर, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये उपस्थित होते.

प्रमोद जठार म्हणाले, सध्या मकर संक्रांतीमध्ये पतंगाच्या महोत्सवात शिवसेनेच्या विश्वासाची 'कटी पतंग' झाली आहे. सर्वत्र एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आहे.
कर्जमाफी, खावटी कर्जमाफी यासाठी पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना भेटण्याऐवजी सतीश सावंत शरद पवारांना जाऊन भेटतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सतीश सावंत यांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांना शेतीतील काही कळत नाही असे सावंत यांना वाटत आहे.

सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी रत्नागिरीतील उदय सामंतांकडे पालकमंत्रीपद दिले आहे.

' चांदा ते बांदा ' ही योजना बंद झाली आहे. ही योजना बंद झाल्यास आमदारकीचा राजीनामा देईन असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांना आता जनतेच्या सहानुभूतीची गरज आहे. ही योजना बंद झाल्याने कोकणावर अन्याय झाला आहे.

त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे या शिवसैनिकांचे नेतृत्व करीत स्वाभिमान दाखवत केसरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. शेळी होऊन पाच वर्षे आमदारकी भोगण्यापेक्षा वाघ होऊन त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी भाजपाची असेल.

राज्याचे पर्यटन मंत्रालय आदित्य ठाकरेंकडे आहे. पण 'लंडन आय' च्या धर्तीवर ' मुंबई आय ' ची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी करायच्या घोषणा सुद्धा अजित पवारच करीत आहेत.

शिवसेना सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मागे फरफटत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रामाणिक शिवसैनिकांचा आता शिवसेनेवर विश्वास राहिलेला नाही. महाविकास आघाडी सरकार मध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षात सावळा गोंधळ दिसून येत आहे. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, भाजप पदाधिकारी निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे . जिल्ह्यात १४ तालुकाध्यक्ष होणार असून ७ तालुकाध्यक्षांची निवड झाली आहे. २१ जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुकाध्यक्ष जाहीर होतील.

जिल्हा बँकेचा राजकीय आखाडा बनवू नका !

जिल्हा बँक ही जिल्ह्यातील गोरगरीब,शेतकरी, लघुउद्योजकांच्या विकासासाठी असते. त्यामुळे जिल्हा बँकेत राजकारण असू नये. कोणीही राजकारणाचा आखाडा बनवू नये.
तिथे जिल्हा विकासाचे पॅनल असावे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार सतीश सावंत महाविकास आघाडीचे पॅनल करत असतील तरी आम्ही सर्वसमावेशक जिल्हा विकास पॅनल करणार आहोत. ज्यांना जिल्हा बँकेचा राजकीय आखाडा बनू नये असे वाटते त्यांनी या पॅनल मध्ये सहभागी व्हावे. त्यांचे आम्ही स्वागत करू . असे जठार यांनी यावेळी सांगितले.

२४ जानेवारीला सरकारवरील अविश्वास दिसेल!

विधान परिषदेसाठी राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अनेक आमदारांशी संपर्क आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होईल. २४ जानेवारी रोजी मतदान असून त्या दिवशी सरकारवर नाराज असलेले आमदार राजन तेली याना मतदान करून आपला सरकारवरील अविश्वास दाखवून देतील. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.
 

Web Title: You become the father of Shiv Sena's dissatisfaction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.