कासार्डेत विजयस्तंभावर पुष्पचक्र अर्पण
By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:49:27+5:302014-06-29T00:49:55+5:30
ऐतिहासिक वारसा जपला : पहिल्या महायुद्धाला १00 वर्षे पूर्ण

कासार्डेत विजयस्तंभावर पुष्पचक्र अर्पण
नांदगांव : पहिल्या महायुद्धातील सैनिकांचा सहभाग व वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ कासार्डे येथे उभारलेल्या विजयस्तंभाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. तरीदेखील आमचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल, असे प्रतिपादन कासार्डे येथील माजी सैनिक रवींद्र पाताडे यांनी केले. पहिल्या महायुद्धाला सुरुवात होऊन १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त कासार्डे विजयस्तंभाजवळ संजय नकाशे मित्रमंडळाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शनिवार २८ जून रोजी पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झाली. १९१४ ते १९१८ असे चार वर्षे हे युद्ध सुरु होते.
कासार्डे परिसरातील १०६ सैनिकांनी त्या महायुद्धात सहभाग घेतल्याची नोंद या स्तंभावरील पाटीवरून दिसून येते. यानिमित्त या स्तंभाकडे रवींद्र पाताडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी पाताडे म्हणाले की, कासार्डेच्या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष होत असले तरीदेखील याठिकाणी स्फूर्ती देणारे स्मारक तयार व्हावे यासाठी येथील लोकप्रतिनिधी व संजय नकाशे मित्रमंडळ प्रयत्न करीत आहेत. त्यांना आम्ही योग्य ते सहकार्य करू आणि आमचा हा वारसा जपला जाईल.
यावेळी संजय नकाशे, गोट्या मुणगेकर, प्रविण मुणगेकर, नीलेश पारधिये, गणेश पाताडे, अभिमन्यू पाताडे, रुपेश पाताडे, सिद्धेश कोकाटे, प्रविण मेजारी, नीलेश पाताडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)