कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेऊ

By Admin | Updated: June 29, 2014 00:50 IST2014-06-29T00:47:53+5:302014-06-29T00:50:15+5:30

दीपक केसरकर : राष्ट्रवादी विरोधात बंडाचा झेंडा

Workers will take the next decision in confidence | कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेऊ

कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढचा निर्णय घेऊ

मालवण : राजीनाम्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रात्री मालवणात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादी विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. मालवण येथील पत्रकार परिषदेत आमदार केसरकर यांनी राष्ट्रवादीत आपला अपमान झाला असून पद पाहिजे म्हणून लाचार होणाऱ्यांपैकी मी नाही. सिंधुदुर्गवासियांचा स्वाभिमानी बाणा काय असतो हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवून देऊ असे ठणकावत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. याच पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आमदार केसरकर यांनी मुहूर्त कुठला काढणार ते त्यांनाच विचारा असे सांगून आपण व आपले कार्यकर्ते शिवसेनेत जाणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या विरोधातील राजकीय बंड पुकारल्यानंतर दीपक केसरकर हे पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मालवणात दाखल झाले. मालवण नगरपरिषद प्रभाग ३ क च्या पोटनिवडणुकीत शहर विकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा गावकर यांच्या प्रचारार्थ आमदार केसरकर यांनी मालवणातील नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार केसरकर पुढे म्हणाले, मालवणात काँग्रेसने जनभावनांचा अनादर करीत लोकशाहीची क्रूर चेष्टा चालवली आहे. त्यामुळे नागरिक मेघा गावकर यांना निवडून देऊन काँग्रेसला धडा शिकवतील. तसेच उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत शहरविकास आघाडीचे सदस्य असणाऱ्या राजन वराडकर यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता असणाऱ्या शहर विकास आघाडीचे वराडकर हे सदस्य असल्याने गटनेते रविकिरण आपटे यांनी त्यांना बजावलेला ‘व्हीप’च अंतिम आहे. काँग्रेस नगरसेवक अशोक तोडणकर यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्याला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना नाहीत. उच्च न्यायालयच त्याला स्थगिती देऊ शकते. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडणुकीत तोडणकर यांना मतदानाची दिलेली संधी ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे मालवणची उपनगराध्यक्ष निवड रद्द होणार आहे असेही आमदार केसरकर म्हणाले. तसेच मालवणच्या पर्यटन विकासात आपण लक्ष घालणार आहोत व आपला दहशतवादविरोधी लढा असाच पुढे सुरु राहणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपनगराध्यक्ष राजेश पोकळे, मालवणचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, उमेदवार मेघा गावकर, नितीन वाळके, बाबी जोगी, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी
खोबरेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Workers will take the next decision in confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.