सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रश्न सोडविणार
By Admin | Updated: November 23, 2014 23:58 IST2014-11-23T22:36:32+5:302014-11-23T23:58:39+5:30
उद्धव ठाकरे : शिवराजेश्वराचे सपत्नीक दर्शन ; दुरवस्थेकडे लक्ष वेधले

सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रश्न सोडविणार
मालवण : ज्यांच्यापासून लढण्याची प्रेरणा घ्यावी, असे शिवरायांसारखे दुसरे दैवत नाही. त्यांचे यथोचित स्मारक व्हावयास हवे. त्यांनी इतिहास घडविताना जलदुर्ग आणि गडकिल्ले बांधले आहेत. हीसुद्धा त्यांची स्मारकेच आहेत. छत्रपतींच्या किल्ल्यांची निगा राखणे आमचे पहिले कर्तव्य आहे. किल्ले सिंधुदुर्गच्या बाबतीतही अनेक अडचणी आणि व्यथा आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याबाबतच्या सर्व प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात कोकणापासून शनिवारी झाली. रविवारी ते मालवण येथे आले असताना त्यांनी पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासमवेत सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, श्रद्धा जाधव, रवींद्र फाटक, अरविंद सावंत,् नगरसेवक रविकिरण आपटे, नगरसेविका सेजल परब, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सुरूवातीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक शिवराजेश्वरांचे दर्शन घेतले. ठाकरे यांनी शिवराजेश्वरांना मानाचा जिरेटोप, शाल व पुष्पहार अर्पण केला. मंदिराचे मानकरी सयाजी सकपाळ यांनी शिवराजेश्वर मंदिराचा इतिहास सांगताना मंदिराच्या झालेल्या दुरवस्थेकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले.
सकपाळ म्हणाले, सन १६९५ला छत्रपती राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचे हे मंदिर बांधले आहे. या मंदिरातील शिवछत्रपतींची मूर्ती या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. कालौघात हे मंदिर जीर्ण झाले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. असंख्य शिवभक्तांनी निधी उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र शासनाच्या पुरातत्व विभागाची परवानगी नसल्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अडले आहे. आपण त्या परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
फोटोग्राफीचा
मोह आवरला नाही
उद्धव ठाकरे स्वत: उत्तम फोटोग्राफर आहेत. किल्ला परिसराची पाहणी करताना त्यांनी एका फोटोग्राफरजवळील कॅमेरा घेत किल्ला परिसराचे काही फोटो टिपले. बोटीतून किल्ल्यावर येतानाही त्यांनी काही फोटो घेतले. त्यांचा फोटोग्राफीचा मोह कौतुकाचा विषय ठरला. (प्रतिनिधी)
केंद्रात आणि राज्यात प्रश्न मांडणार
४सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या जीर्ण झाल्या आहेत. किल्ल्यावर पाच ऐतिहासिक मंदिरे आहेत. पाण्याची तळी आहेत. या सर्वांची दुरवस्था झाली आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहाची सोय नाही. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक व्हावी, असे निवेदन ठाकरे यांना सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघाकडून देण्यात आले. यावर शिवसेनेचे खासदार केंद्रात आणि आमदार राज्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रश्नांबाबत लक्ष घालतील. किल्ल्याच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निगा राखणे आमचे कर्तव्यच
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे लक्ष घालून त्याची निगा राखणे आमचे कर्तव्यच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन नेहमीच त्याची निगा राखणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडून किल्ल्याच्या समस्या ऐकणे गरजेचे होते. किल्ल्याची डागडुजी व्हावी, त्याची योग्यप्रकारे निगा राखावी ही आमची सुरूवातीपासूनची इच्छा आहे. यासाठीच आमच्याकडून योगदान म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी किल्ल्याला देणगी दाखल ५० लाख रूपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र या निधीचा विनियोग कशाप्रकारे केला जाईल, याची आम्हाला कोणीही कल्पना न दिल्यामुळे ५० लाखांचा निधी द्यायचा राहिला आहे. तो आम्ही लवकरच देऊ. मात्र, त्याचा विनियोग योग्यप्रकारे झाला पाहिजे.