मच्छी विक्रेत्यांचा वाद चिघळणार ?

By Admin | Updated: November 5, 2014 00:02 IST2014-11-04T21:49:45+5:302014-11-05T00:02:49+5:30

रत्नागिरी पालिका : नगराध्यक्षांच्या कारवाईच्या इशाऱ्याने महिला संतप्त

Will the fish marketers get angry? | मच्छी विक्रेत्यांचा वाद चिघळणार ?

मच्छी विक्रेत्यांचा वाद चिघळणार ?

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या झारणी रोड येथील मच्छी मार्केट दुरुस्ती कामासाठी अन्यत्र स्थलांतर करण्यास मच्छी विके्रेत्या महिलांनी कडाडून विरोध केला आहे. टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आश्वासन देऊनही मच्छी विक्रेत्या महिलांचे समाधान झाले नसल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यांना आमच्यासारख्याच रत्नागिरीकरांनी निवडून दिले, तेच आता मच्छी मार्केटमधून विक्रेत्यांना बाहेर काढण्यासाठी कायदेशीर कारवाईची भाषा करीत असल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे.
चार दिवसांत जागा खाली करा, अशी नोटीस मच्छी मार्केटमध्ये लावली गेल्याने संतप्त महिलांनी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची भेट घेऊन आपला निषेध नोंदवला. स्थलांतर न करता आतील काम काही टप्प्यात करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिल्यानंतरही हा वाद शमलेला नाही. कोणत्याही स्थितीत मच्छी विक्रेत्या महिला पऱ्याशेजारी असलेल्या असुरक्षित जागी मच्छी विक्रीसाठी स्थलांतरीत होणार नाहीत, या भूमिकेवर विक्रेत्या महिला ठाम असून, याप्रकरणी पालिकेने दांडगाई केल्यास वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झारणी रोड येथील मच्छी मार्केट नेहमीच गजबजलेले असते. या इमारतीचे बांधकाम २००४ मध्ये करण्यात आले होते. २०१० मध्ये नगराध्यक्षपदी राजेश्वरी शेट्ये असतानाही अंतर्गत दुरुस्तीवर मोठा खर्च करण्यात आला होता. त्यावेळी अंतर्गत दरवाजे व अन्य काम करण्यात आले होते. मात्र, बाहेरून चकाचक दिसणाऱ्या या मच्छी मार्केटच्या आतील भागातील लाद्या (टाईल्स) फुटल्या आहेत. मच्छी विक्रीसाठीचे कट्टेही खराब झाले आहेत. इमारतीबाहेर टाकलेल्या चेकर्ड टाईल्सचा चुरा झाला आहे.
वारंवार या मार्केट इमारतीच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही केलेले काम फार काळ का टिकत नाही, केलेले काम किती काळ टिकणार, याबाबतचे नियम तरी काय आहेत. त्यानुसार नव्याने दुरुस्ती होताना आधीच्या कामाच्या हमीबाबतची मुदत पूर्ण झाली आहे काय? पूर्वीचे कंत्राट कोणाला दिले होते व त्याने कामाबाबतचे निकष, नियम योग्यरित्या पाळले का? नियम पाळले असतील तर पुन्हा इतक्या लवकर दुरुस्तीची गरज का निर्माण झाली. नियम पाळले नसतील तर संबंधितांवर कारवाई होणार काय, असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.
मार्केट इमारतीतील जमिनीच्या लाद्या जागोजागी फुटल्या आहेत. त्यामुळे लाद्यांवर पडलेले बर्फाचे पाणी अंतर्गत गटारात न जाता फुटलेल्या लादीतच साचून राहते. त्यामुळे मच्छिमार्केटच्या इमारतीत मच्छी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दुर्गंधी सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मच्छी मार्केट इमारतीच्या आतील भागात दुरुस्तीचे काम करणे आवश्यकच आहे. मात्र, पूर्वी केलेले काम, त्याचा दर्जा याबाबत फुटलेल्या लाद्या, फुटलेले कट्टे पाहता शंका निर्माण होण्याजोगी स्थिती आहे. मच्छी मार्केटच्या दुरुस्तीसाठी तब्बल ८० लाखांचा ठेका पालिकेने दिला आहे. संबंधित ठेकेदार येत्या १५ दिवसांत हे दुरुस्ती काम सुरू करणार असून, त्यासाठी मच्छी विक्रेत्यांना तेथीलच पऱ्याशेजारी असलेल्या हापूसच्या झाडाखाली मच्छी विक्री करण्यास सांगण्यात आले. त्याला विक्रेत्यांनी विरोध केल्याने नगराध्यक्ष मयेकर यांनी मार्केट इमारतीत टप्प्याटप्प्याने दुरुस्ती काम करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, हा पर्यायही अनेक मच्छी विक्रेत्यांना रुचलेला नाही. त्यातच मच्छी विक्रेत्या महिला स्थलांतरीत झाल्या नाहीत तर कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असा इशारा नगराध्यक्षांनी दिल्याने महिला संतप्त आहेत. (प्रतिनिधी)

दुरस्तीसाठी दोन महिने लागणार
नगराध्यक्षांची भूमिका
शहरातील हे मुख्य मच्छी मार्केट असल्याने त्याचे अंतर्गत सुशोभिकरण अत्यंत आवश्यक आहे. आतील सुविधाही महत्त्वाच्या आहेत. या सुविधा मुख्यत्वे मच्छीविक्रेत्यांसाठीच आहेत. तसेच मच्छी खरेदीला येणाऱ्या ग्राहकांनाही या इमारतीतील स्वच्छता महत्त्वाची वाटते. त्यामुळेच या कामासाठी ८० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्ती कामासाठी महिना ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीविक्रेत्यांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याची नगराध्यक्ष मयेकर यांची भूमिका आहे.
आंब्याखालील जागा गैरसोयीची
याआधीही आंब्याच्या झाडाखालील जागा मच्छिविक्रेत्यांना पर्यायी म्हणून देण्यात आली होती. मात्र, ती खूपच गैरसोयीची असून, तेथे असलेल्या पऱ्यातून येणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांचाही त्रास सहन करावा लागतो. तसेच उन्हाचे चटकेही सहन करावे लागतात. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. त्यामुळे अनेक गैरसोयी असलेल्या या ठिकाणी स्थलांतरीत होण्यास विक्रेत्यांचा विरोध आहे.

Web Title: Will the fish marketers get angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.