कणकवली भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 04:03 PM2019-12-02T16:03:04+5:302019-12-02T16:05:14+5:30

भाजपा पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानुसार तालुक्यातील सक्रिय सदस्यांमधून नवा तालुकाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. सध्या तालुकाध्यक्षपदाचा पदभार राजन चिके यांच्याकडे आहे. त्यामुळे आता भाजपाचा नवा तालुकाध्यक्ष कोण होणार? याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Who will be the president of Karnavali BJP? | कणकवली भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

कणकवली भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?चिके, कानडे, सावंत, परुळेकर यांची नावे चर्चेत

कणकवली : भाजपा पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानुसार तालुक्यातील सक्रिय सदस्यांमधून नवा तालुकाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. सध्या तालुकाध्यक्षपदाचा पदभार राजन चिके यांच्याकडे आहे. त्यामुळे आता भाजपाचा नवा तालुकाध्यक्ष कोण होणार? याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत राजन चिके, पंचायत समिती माजी उपसभापती संतोष कानडे, विद्यमान तालुका सरचिटणीस बबलू सावंत, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांच्यासह अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत.

५ डिसेंबरला तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया होणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन झाल्यामुळे तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान राणेंचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे नाराज झालेल्या तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे तत्काळ राजन चिके यांच्याकडे तालुकाध्यक्ष पदाचा पदभार देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात कणकवली तालुक्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आतापर्यंत कणकवली तालुका हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा गड मानला जात आहे. यापुढील काळात तो भाजपाचा गड म्हणून शाबूत ठेवण्याच्यादृष्टीने तालुकाध्यक्षाची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या महत्त्वपूर्ण पदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भारतीय जनता पार्टीतील काही निष्ठावंत कार्यकर्ते या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये राजन चिके, शिशिर परुळेकर, बबलू सावंत ही प्रमुख नावे आहेत. तर विधानसभा निवडणुकीत नाराज असलेल्या संतोष कानडे यांना भाजपात थांबविण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचे मान्य केले होते.

अशी चर्चा त्यावेळी सर्वत्र रंगली होती. त्यामुळे या तालुकाध्यक्षपदावर संतोष कानडे यांची वर्णी लागणार का? असा प्रश्नही तालुकावासीयांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तालुकाध्यक्ष कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे.

Web Title: Who will be the president of Karnavali BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.