कुठे नेऊन ठेवलाय गणवेश यांचा...
By Admin | Updated: November 14, 2014 23:16 IST2014-11-14T22:57:23+5:302014-11-14T23:16:24+5:30
परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

कुठे नेऊन ठेवलाय गणवेश यांचा...
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रिक्षा वाहतूक करणाऱ्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत एकही रिक्षाचालक गणवेश परिधान करत नाही. शिवाय त्याबाबत रिक्षाचालकांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार ६८६ रिक्षाचालकांना परवाना देण्यात आला आहे. रिक्षा चालकांसाठी गणवेश निश्चित करण्यात आला आहे. परमीटमालकाला पांढरा, तर चालकाला खाकी रंगाचा गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. तत्कालिन वाहतूक अधीक्षक राजीव मुठाणे यांनी गणवेश सक्तीचा केला होता. त्यानुसार सर्व रिक्षा चालक - मालक गणवेशातच वाहतूक करताना दिसून येत होते. मुठाणे यांची बदली झाल्यानंतरही काही महिने रिक्षाचालक गणवेशात वाहतूक करीत होते. परंतु सध्या एकही रिक्षाचालक गणवेशात दिसून येत नाही.
वाहतूक पोलीस सर्वत्र कार्यरत असताना, त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. गर्दीच्या वेळी शहराबरोबर शहरात प्रवेश करणाऱ्या नाक्यावरही त्यांची तपासणी सुरू असते. असे असताना त्यांच्या पुढ्यातून रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यांना गणवेश न वापरणारे रिक्षा चालक दिसत नाहीत का? असा सवाल निर्माण होत आहे.
चालकांसाठी गणवेशाबाबत नियम बनविला जात असेल तर तो शिथिल का केला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रिक्षा, टॅक्सीचालक खाकी रंगाचा गणवेश परिधान करतात. परंतु रत्नागिरीत नियमाचे काही दिवसच पालन केले जाते, तद्नंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’ प्रमाणे सुरू आहे.
काही रिक्षाचालकांकडे चर्चा केली असता गणवेश सध्या कोणीच वापरत नसल्याचे कबूल केले. वाहतूक पोलीसदेखील सक्ती करीत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी रिक्षाचालक गणवेश परिधान करीत होते. रत्नागिरी शहरात रिक्षांची संख्या वाढत आहे. रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असतात. दिवसाला रिक्षा व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न कमी आहे. पेट्रोल, बँक हप्ता, देखभाल दुरूस्ती खर्च वजा जाता रिक्षा चालकांना मिळणारे उत्पन्न अल्प आहे. खाकी गणवेश ठीक आहे. परंतु पांढरा गणवेश कच्च्या रस्त्यामुळे खराब होतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा गणवेश रद्द करून केवळ खाकी गणवेश करण्यात यावा. (प्रतिनिधी)