रांगणागड उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: October 21, 2014 23:39 IST2014-10-21T22:35:27+5:302014-10-21T23:39:43+5:30
बुरूज ढासळण्यास सुरूवात : पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

रांगणागड उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
सुरेश बागवे - कडावल -महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा समर्थ साक्षीदार असलेला रांगणा गड आता पुरता जीर्ण झाला आहे. गडाचे दोन्ही बुरूज कोसळत असून तटबंदीही ढासळली आहे. दरवाजांची दुरवस्था झाली आहे. गडावरील विहिरी, तलाव बुजत आहेत. गडाचे महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी इ.स. १६७०-७१ मध्ये डागडुजीसाठी सहा हजार होन खर्च केल्याची नोंद इतिहासात आढळते. मात्र, सद्यस्थितीत हा ‘रांगणा’ गड पुरता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना पुरातत्व विभागाची नजर मात्र या स्वराज्याच्या रक्षणकर्त्या गडाकडे वळू नये, हे महाराष्ट्र भूमीचे दुर्दैव म्हणावे लागेल.
शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) याने इ. स. ११८७ च्या सुमारास रांगणागडाचे निर्माणकार्य पूर्णत्वास नेले. अभेद्य नैसर्गिक तटबंदी आणि मानवनिर्मित तटबंदीचा मेळ साधून सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत दुर्गम व मोक्याच्या ठिकाणी या विशाल गडाची भक्कम बांधणी करण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असलेल्या रांगणागडाची रचना उत्तर-दक्षिण असून गडाच्या पूर्व-पश्चिम दिशांना खोल दऱ्या आहेत.
उत्तर दिशेला यशवंत दरवाजा, पश्चिमेला गणेश दरवाजा, दक्षिणेला हनमंत दरवाजा, तसेच एक दिंडी दरवाजा व अन्य एक मिळून गडावर जाण्यासाठी एकूण पाच जीर्ण दरवाजे आहेत. सर्व दरवाजांच्या बांधकामासाठी काळ्या दगडांचा वापर करण्यात आला असून दोन दगडांमधील सांधपासाठी चुन्याचा वापर करण्यात आला आहे. काळाच्या ओघात पाचही दरवाजे जीर्ण झाले आहेत. ‘रांगणा’ला दोन बुरूज आहेत. यापैकी एक बुरूज उत्तर दिशेला यशवंत दरवाजा, तर दुसरा बुरूज गडाच्या पूर्व दिशेला असून हे दोन्ही बुरूज ढासळले आहेत. यशवंत दरवाजावरल बुरुजाच्या वरच्या भागातील मोठमोठे दगड कोसळून त्यांचा पायथ्याशी ढीग झाला आहे. बुरुजांप्रमाणेच गडाच्या तटबंदीची अवस्थाही बिकट झाली आहे. रांगणाला यशवंत दरवाजापासून गणेश दरवाजापर्यंत उत्तर-दक्षिण अशी मजबूत तटबंदी करण्यात आली होती. दगड कोसळल्यामुळे तटबंदीचा वरील भाग नष्ट झाला असला, तरी काही भाग आजही सुस्थितीत आहे. गडावरील रांगणाई मंदिर व हनुमान मंदिराचीही पडझड झाली होती. नारूर ग्रामस्थांनी या मंदिराची दुरुस्ती केली आहे. जलव्यवस्थापनासाठी त्याकाळी अवलंबिलेले तंत्रज्ञान आश्चर्यकारक आहे. जमिनीपासून सुमारे २२०० फूट उंचीवर उपलब्ध करण्यात आलेले जलस्त्रोत पाहता, त्यावेळच्या प्रगत तंत्रज्ञानाची खात्री पटते. पाण्यासाठी रांगणावर अनेक विहिरी व तलाव बांधण्यात आले होते. यापैकी बहुतेक विहिरी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. निंबाळकरवाड्यातील एकमेव विहीर आजमितीपर्यंत सुस्थितीत होती. तिचीही आता पडझड झाली आहे. परंतु थोड्याशा डागडुजीनंतर ही विहीर वापरात आणणे शक्य आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पर्यटनाचा बराच बोलबाला आहे. पर्यटनविषयक दृष्टीकोन ठेवून रांगणागडाची डागडुजी त्वरीत करण्याची गरज आहे. येथे काही आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध केल्यास या ऐतिहासिक वास्तूचे रक्षण होऊन देशी-विदेशी पर्यटकांना पर्यटनाचे आणि स्थानिकांना रोजगाराचे दालन खुले होणार आहे. यासाठी गरज आहे ती सकारात्मक राजकीय इच्छाशक्तीची.
अनेक स्थित्यंतरानंतरही अढळ
रांगणा गडावर अनेक परकीय आक्रमणे झाली. बहामणी राजा महम्मद गवाण याने सन १४७० मध्ये गड ताब्यात घेतला. त्यानंतर पुढे तो १६५८ पर्यंत विजापूरच्या आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता. सन १६५९ मध्ये आदिलशहाला धूळ चारत छत्रपती शिवरायांनी रांगणा स्वराज्याला जोडला. सन १६६६ मध्ये आदिलशहाने गडावर पुन्हा कब्जा मिळविला. ५ सप्टेंबर १६६६ ला शिवरायांनी आदिलशहाला पुन्हा नेस्तनाबूत करून गड पुन्हा स्वराज्यात सामील केला. अशी अनेक राजकीय स्थित्यंतरे रांगणा गडाने पाहिली आहेत. तरीही तो अखेर हिंदवी स्वराज्याची भगवी पताका आणि गुढ्या-तोरणे अंगा-खांद्यावर मिरवित आजही अभिमानाने उभा आहे.
गडावरील तळ्याच्या संवर्धनाची गरज
गडावरील दोन तळ्यांपैकी एक तळे पूर्णत: नष्ट झाले आहे. दुसऱ्या तळ्यात मात्र बारमाही पाणीसाठा असतो. त्याचा वापरही करण्यात येतो.
हे तळे एकसंध खडक कोरून खोदले असून या खडकाचे दगड गडाच्या बांधकामासाठी वापरल्याचे सांगण्यात येते.
गडावर येणारे पर्यटक सध्या याच तळ्याच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी करतात.