पाण्याचे स्त्रोत आता ‘गुगल मॅप’वर दिसणार

By Admin | Updated: November 5, 2014 23:34 IST2014-11-05T22:34:18+5:302014-11-05T23:34:07+5:30

जिल्हा परिषद : पाण्याच्या ७ हजार ७८७ स्त्रोतांचे जीपीएस नकाशे

The water source will now appear on 'Google map' | पाण्याचे स्त्रोत आता ‘गुगल मॅप’वर दिसणार

पाण्याचे स्त्रोत आता ‘गुगल मॅप’वर दिसणार

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत आता गुगल मॅपवर दिसणार असून, यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ७,७८७ पाण्याच्या स्रोतांचे जीपीएस नकाशे करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांनी सांगितले.
सध्या पाण्याच्या स्त्रोतांचे एकत्रीकरण नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहात आहेत. अनेकवेळा जवळपास पाण्याचा कोणता स्रोत आहे, याची माहितीही मिळत नाही. पाणीटंचाईच्या काळात पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला स्रोत माहीत नसल्यानेही दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च पाणीटंचाईवर होत आहे. मात्र, आता हा खर्च काही प्रमाणात आटोक्यात येणार आहे. कारण जिल्हा परिषदेने याकामी पुढाकार घेतला आहे.
पाणी व स्वच्छता मिशनमार्फत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या ७,७८७ स्रोतांचे जीपीएसच्या माध्यमातून गुगल मॅपवर एकत्रीकरण होणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर, नागपूर या संस्थेकडून नकाशे काढण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातही कार्यवाहीला प्रारंभ झाला असून, २० टक्के सार्वजनिक पाणीस्रोतांची तपासणी करण्याचे काम पथदर्शी प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४६ पाणीस्रोतांची या मोहिमेंतर्गत तपासणी करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील सुत्रांकडून सांगण्यात आले.
पाण्याच्या स्रोेतांचे स्थान केवळ या मॅपवर दिसणार नाही तर त्या ठिकाणचे रेखांश, अक्षांश तसेच समुद्र सपाटीपासूनची उंची व खोलीची नोंद केली जाणार आहे. या स्त्रोतांवर जास्तीत जास्त लोकसंख्या अवलंबून असेल, असा स्रोत गुगल मॅपवर शोधणे लवकरच शक्य होणार
आहे.
स्रोतांचे निश्चितीकरण करताना त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेगवेगळे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नकाशावर पाणीस्त्रोतांची नोंदणी करणे, पाणी दूषित आढळल्यास ठळकपणे निर्देशित करणे, योग्य सांकेतांक देताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे त्यामुळे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर, नागपूर या संस्थेकडून नकाशे काढण्याचे काम सुरू.
जिल्ह्यातही कार्यवाहीला प्रारंभ.
स्रोतांचे निश्चितीकरण करताना त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेगवेगळे नकाशे तयार करण्यात येणार.

Web Title: The water source will now appear on 'Google map'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.