कचरा व्यवस्थापनाची गरज
By Admin | Updated: November 3, 2014 23:24 IST2014-11-03T21:42:54+5:302014-11-03T23:24:48+5:30
सावंतवाडीत रोगराईची भीती : डेपोतील कचरा रस्त्यावर

कचरा व्यवस्थापनाची गरज
सावंतवाडी : येथील लाडाची बाग परिसरातील कचरा डेपोमध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढले असून सर्व कचरा आणि घाण रस्त्यावर येऊ लागली आहे. त्यामुळे जवळपासच्या वाड्यातील घरांमध्ये रोगराई व साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या कचऱ्याच्या साठ्यामुळे डासांची पैदास होऊन तापसरीची लागण या परिसरात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे या कचरा व्यवस्थापनासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बेळगाव-सावंतवाडी या मार्गावर हा कचरा डेपो आहे. बरेच पर्यटक पर्यटनासाठी सावंतवाडी तालुक्यात येतात. यावेळी त्यांना परिसरातील कचरा आणि घाणीचा त्रास सहन करावा लागतो. पूर्ण प्रवास संपेपर्यंत हा वास नाकामधून जात नसल्याची तक्रार वाहनचालकांची आहे. या कचरा डेपोच्या दरवाज्यावर आणि बाहेरही कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. हा कचरा वाऱ्यामुळे तसेच अन्य कारणांनी मुख्य रस्यावर येतो. त्यामुळे या भागातून प्रवास करणारी वाहने अथवा पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
संपूर्ण सावंतवाडीतील कचरा या कचरा डेपोमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे डेपोत कचऱ्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामुळे कचरा कुजतो. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्या रुतण्याच्या भीतीने डेपोमध्ये घातल्या जात नाहीत.
परिणामी कचरा डेपोच्या दरवाज्यावरच फेकला जातो. यामुळे डेपोच्या दरवाज्यावर कचऱ्याचा ढीग साचला आहे. हा कचरा जेसीबी सारख्या यंत्रानेच बाजूला करणे योग्य ठरेल. यासाठी संबंधित विभागाने त्वरीत योग्य ती कार्यवाही करून संभाव्य धोके टाळण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे आहे.
साथरोगांचा प्रादुर्भाव शक्य
कचरा डेपोतील अस्ताव्यस्त पडलेला आणि मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा तसेच ओढ्यातून नदीला मिळणारे सांडपाणी यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. काहीगावांमध्ये साथरोगाचे रूग्ण सापडले आहेत. काही रुग्ण दगावल्याचीही उदाहरणे आहेत. नगरपालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
शेतीला सांडपाण्यापासून धोका
या कचरा डेपोलगत असलेल्या ओढ्यामध्ये सावंतवाडीतील सांडपाणी सोडले जाते. या ओढ्याचे पाणी नदीपात्राला जाऊन मिळते. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या कारिवडे, माडखोल आदी गावातील शेतीला या सांडपाण्यापासून धोका पोहोचू शकतो. शेतकऱ्यांच्या जनावरांनाही पिण्यासाठी या नदीतील पाणी दिले जाते. त्यामुळे शहरातील सांडपाणी नदीत न सोडता अन्य ठिकाणची त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.