आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार, पर्यटनाला चालना मिळणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 18, 2025 18:59 IST2025-02-18T18:57:54+5:302025-02-18T18:59:53+5:30

गुलदार नावाचा अर्थ काय.. वाचा सविस्तर

Warship INS Guldar will soon dock at Vijaydurg port Sindhudurg district | आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार, पर्यटनाला चालना मिळणार 

आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार, पर्यटनाला चालना मिळणार 

कणकवली : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधीलपर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यांनी या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. अखेर, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.

पर्यटनवाढीस लागणार मोठा हातभार

ही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला येणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल.

आयएनएस गुलदार एक शक्तिशाली युद्धनौका

भारतीय नौदलाच्या ऑण्डिंग शिप टँक (मध्यम) श्रेणीतील आईएनएस गुलदार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • नौदलात समावेश : ३० डिसेंबर १९८५
  • विस्थापन : १,२०० टन
  • लांबी : ८१ मीटर
  • रुंदी (बीम) : १० मीटर
  • सक्षम अधिकारी व कर्मचारी : ६ अधिकारी आणि ८५ खलाशी


वाहन क्षमता :

  • चिलखती कर्मचारी वाहक,
  • रणगाडे (टँक),
  • स्वयंचालित तोफा, ट्रक
  • १५० पेक्षा अधिक सैन्य


सामरिक सामर्थ्य आणि संरक्षण

आईएनएस गुलदार अत्याधुनिक ३० मिमी क्लोज-रेंज गन आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. हे जहाज विविध नौदल मोहिमांमध्ये प्रभावीपणे सहभागी झाले आहे.

आपत्ती निवारण आणि मानवी मदतकार्य

युद्धसज्जतेव्यतिरिक्त, हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरले जाते.

गुलदार नावाचा अर्थ

गुलदार हे नाव भारतीय बिबट्याच्या (गुलदार) प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे. जे नौकेच्या वेग, ताकद आणि चपळतेचे प्रतीक आहे.

विजयदुर्गसाठी नव्या पर्वाची सुरुवात

भारतीय नौदलाचे आईएनएस गुलदार ही केवळ युद्धनौका नसून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल, ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढेल.

Web Title: Warship INS Guldar will soon dock at Vijaydurg port Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.