विकासासाठी मतदार मनसेच्या पाठी उभे राहतील
By Admin | Updated: April 2, 2016 00:11 IST2016-04-01T22:52:04+5:302016-04-02T00:11:31+5:30
धीरज परब यांचा विश्वास : कुडाळचा नगराध्यक्ष मनसेच ठरविणार, आघाडी, युतीकडून यापूर्वी लोकांचा भ्रमनिरास--कुडाळ गावाकडून नगराकडे

विकासासाठी मतदार मनसेच्या पाठी उभे राहतील
रजनीकांत कदम -- कुडाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये या अगोदर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी व त्यांच्या आघाडी व युती यांनी अनेकदा सत्ता भोगली आहे. परंतु जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या या शहरात हवा तसा विकास आणि नागरी सुविधा ते देवू शकले नाहीत. त्यामुळे कुडाळचा सर्वांगीण विकास होण्यासाठी यावेळी कुडाळचे मतदार हे मनसेच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच कुडाळचा नगराध्यक्ष हा मनसेच ठरविणार असेही सांगितले.परब म्हणाले की, कुडाळ नगरपंचायत होण्याअगोदर या ठिकाणी ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीवर काँग्रेस, शिवसेना भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी अनेकदा सत्ता उपभोगली. मात्र, कुडाळचा हवा तसा विकास यांच्यापैकी कोणीच केला नाही. ते नागरी सुविधाही देवू शकले नाहीत. कुडाळ शहरातील तिघेजण जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. मात्र, त्यांनी कुडाळचा विकास केला नाही. कुडाळमधील युती आणि आघाड्यांमधील स्थानिक नेतृत्वांचे पक्ष बदलले परंतु चेहरे तेच राहिले आहेत. त्यामुळे त्याच- त्याच नेतृत्वाकडून जनतेने काय अपेक्षा ठेवाव्यात हा प्रश्न जनतेस पडला आहे. आणि म्हणूनच येथील शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, जनतेला नागरीसुविधा देण्यासाठी या कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे.
यापूर्वीच मनसेने जनतेस आवाहन केले होते की, कुडाळच्या विकासासाठी चांगले प्रशासन, चांगल्या सुविधा व नियोजनबद्ध विकासकामे व्हावीत याकरिता सेवाभावी व्यक्तींनी पुढे यावे, त्यांच्या पाठीशी मनसे खंबीर राहील. या आवाहनाप्रमाणे आमच्या पक्षाच्यावतीने उभे करण्यात आलेले उमेदवार हे सेवाभावी वृत्तीचे, जनतेच्या समस्यांची जाण असणारे, सुशिक्षित, जनसंपर्क व जनहितासाठीच झटणारे व भ्रष्टाचारात न बरबटलेले असे उमेदवार दिले आहेत. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी भ्रष्टाचारात अडकलेली असून भाजप व शिवसेना राज्यापासून ते केंद्रापर्यंत श्रेयवादासाठी भांडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विश्वासच उडालेला आहे. मनसे नेहमीच मराठी तरुणांच्या रोजगारासाठी, मराठी माणसांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे. मनसेचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून कुडाळवासीयांना चांगल्या सुविधा, प्रशासन व नियोजनबद्ध विकासकामे निश्चितच करण्यात येतील. यामध्ये नागरी सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, बंद गटार, ड्रेनेज साफसफाई, शाळा, दवाखाना, रस्ते, आरोग्य तसेच अन्य महत्त्वपूर्ण कामे करून कुडाळ शहर आदर्श शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी आतापर्यंत जनतेला आश्वासने देण्याचे काम केले. त्यामुळे लोक कंटाळले असल्याचेही धीरज परब यांनी सांगितले.
राणेंवर जबाबदारी सोपवतील
या निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विचारांना प्रेरित होवून जनहित हेच एकमेव ध्येय घेवून उमेदवार निवडणूक लढवीत असून सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील व विद्यमान नगराध्यक्ष निवडीच्या चाव्या मनसेच्या हाती राहतील, असा ठाम विश्वास आम्हाला आहे.
- धीरज परब, मनसे, जिल्हाध्यक्ष