ग्रामस्थांचा विरोध न जुमानता काम सुरू
By Admin | Updated: May 29, 2015 23:46 IST2015-05-29T22:31:12+5:302015-05-29T23:46:04+5:30
कुर्ली बौद्धवाडीतील विहीर : ग्रामस्थांनी मारली प्रशासनाविरोधात बोंब

ग्रामस्थांचा विरोध न जुमानता काम सुरू
वैभववाडी : कुर्ली बौद्धवाडीच्या संपूर्ण पुनर्वसनाच्या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी बुडीत क्षेत्रातील विहिरीच्या दुरूस्तीचे काम रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने ग्रामस्थांचा विरोध न जुमानता पोलीस बंदोबस्तात विहीर दुरूस्तीला सुरूवात केली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी निषेध म्हणून गाऱ्हाणे घालून नारळ फोडत प्रशासनाच्या नावाने बोंब ठोकली. यावेळी महिला व ग्रामस्थ एकवटल्यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.
देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात कुर्ली बौद्धवाडीची विहीर आहे. सध्या धरणात ९१.९९८ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजेच १८६ तलांक पाणीसाठा असून यावर्षी तो १८७ तलांक म्हणजे १००.४२८ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा केला जाणार आहे. हीच धरणाची पूर्ण साठवण क्षमता आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढल्यानंतर कुर्ली बौद्धवाडीच्या विहिरीत धरणाचे पाणी जाणार असल्याने धरणाचे पाणी विहिरीत जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने विहीर दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. विहीर दुरूस्तीऐवजी संपूर्ण वाडीचेच पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी आधीपासूनच लावून धरली आहे. परंतु प्रशासनाने मागणी धुडकावून लावत विहीर दुरूस्तीचे काम गुरूवारीच सुरू केले जाणार होते. परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे गुरूवारी सुरू होऊ शकले नव्हते. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे पाटबंधारे खात्याला आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी कार्यवाही सुरू करण्यात आली. बुडीत क्षेत्रातील विहिरीच्या दुरूस्तीसाठी यंत्रणा नियोजित स्थळी दाखल होताच योगेश सकपाळ व रमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कुर्ली बौद्धवाडीतील ग्रामस्थ एकवटले होते. त्यांनी विहिरीचे काम सुरू करण्यास मज्जाव करीत नजिकच्या घरात बैठक घेत ठाम विरोध दर्शविला. या विरोधाला न जुमानता प्रशासनाने विहिरीच्या दुरूस्तीचे काम जेसीबीच्या सहाय्याने कडक बंदोबस्तात दुपारनंतर सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांनी नारळ फोडून प्रशासनाचा निषेध म्हणून बोंब ठोकली. (प्रतिनिधी)
कुर्ली बौद्धवाडीत ३४ घरे असून धरणात पूर्ण क्षमतेनुसार पाणी साठविल्यानंतर ७ घरांना बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. संपूर्ण वाडीचेच पुनर्वसन करावे, ही तेथील ग्रामस्थांची मागणी असल्याने पाटबंधारे विभागाकडून खास बाब म्हणून प्रशासनास प्रस्ताव सादर केला गेला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव धुडकावला
- वसंत कदम,
सत्यशोधक संघटना कार्यकर्ते
धरणाची साठवण क्षमता १८७ तलांक असून आतापर्यंत १८६ तलांक एवढेच पाणी साठवले जात होते. त्यामुळे शासनाकडून विचारणा होत होती. यंदा पूर्ण क्षमतेने साठा करण्याचे आदेश आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार असून १८८ तलांक ही महत्तम पूर रेषा असून या साठ्यामुळे कोणालाही बाधा पोहोचत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची तरतूदच नाही.
- एस. के. शेंडगे, उपअभियंता