Vaibhavwadi Panchayat Samiti meeting blocked, ruling party, opposition unanimous | वैभववाडी पंचायत समितीची सभा रोखली, सत्ताधारी, विरोधकांचे एकमत

वैभववाडी पंचायत समितीची सभा रोखली, सत्ताधारी, विरोधकांचे एकमत

ठळक मुद्देवैभववाडी पंचायत समितीची सभा रोखली, सत्ताधारी, विरोधकांचे एकमत प्रशिक्षण खर्च घोटाळ्याच्या चौकशीसाठी सदस्य आक्रमक

वैभववाडी : प्रशिक्षण खर्चाच्या चौकशीबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत सभा चालूच देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत सर्व सदस्यांनी सुमारे ४५ मिनिटे सभा रोखून धरली. त्यामुळे प्रथमच प्रशासनाविरोधात सत्ताधारी व विरोधकांत एकवाक्यता पहायला मिळाली. अखेर सभापती अक्षता डाफळे यांनी चौकशी अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी आठ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरू झाले.

वैभववाडीपंचायत समितीची मासिक सभा सभापती डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. या सभेला उपसभापती दुर्वा खानविलकर, सदस्य अरविंद रावराणे, मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी विद्या गमरे, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गंत झालेल्या प्रशिक्षण खर्चाचा विषय सभेत पुन्हा उपस्थित केला गेला. या प्रकरणाची चौकशी झाली का? अशी विचारणा सदस्यांनी केली. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी झाली नसल्याचे सांगितले. या उत्तरामुळे सर्वच सदस्य आक्रमक झाले. गेल्या महिनाभरात कोणतीच कारवाई का होऊ शकली नाही? त्याचे उत्तर आम्हांला मिळाले पाहिजे.

जोपर्यंत या विषयाचा सोक्षमोक्ष लागत नाही; तोपर्यंत पुढच्या एकाही विषयावर चर्चा होणार नाही, अशी ताठर भूमिका घेत गटविकास अधिकारी म्हणून तुम्ही काय निर्णय घेतला? असे सदस्यांनी विचारले असता गमरे यांनी एकप्रकारे प्रशिक्षण खर्चाच्या घोटाळ्यावर पांघरूण घालत ह्ययापुढे असा प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईलह्ण, असे स्पष्टीकरण दिले.

त्यामुळे सत्ताधारी व विरोधक चार सदस्यांनी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पाढा वाचायला सुरुवात केली. लोके यांनी साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर, व्हिडिओ शुटिंग कॅमेरा पंचायत समितीच्या मालकीचा आहे हे सर्वांना माहीत आहे. त्या बाबींवर स्वतंत्र खर्च दाखविला आहे. त्यामुळे उघडपणे झालेल्या अपहाराची चौकशी करायला किती वेळ लागतो? एक महिन्यात काहीच कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर सभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा चौकशी अधिकारी दीपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला.

त्यावेळी पाटील यांनी येत्या आठ दिवसांत चौकशी करून अहवाल दिला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे तब्बल ४५ मिनिटांनी पुन्हा सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्रख चौकशी अधिकारी येण्याआधी आम्हाला आगाऊ कल्पना द्या, अशी सूचना लोके यांनी केली.

त्या विस्तार अधिकाऱ्याची सभेला दांडी ?

प्रशिक्षण खर्च घोटाळा, पीपीई कीट गैरव्यवहारासह अनेक विषयांशी संबधित असलेला विस्तार अधिकारी मागील सभेप्रमाणे बुधवारी झालेल्या सभेलाही अनुपस्थित होता. त्यामुळे सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. गटविकास अधिकारी विद्या गमरे यांनी ह्यतोह्ण विस्तार अधिकारी प्रशिक्षणासाठी गेल्याचे सभागृहात सांगितले.

Web Title: Vaibhavwadi Panchayat Samiti meeting blocked, ruling party, opposition unanimous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.