राणे कंपनीकडून आपल्या भल्यासाठी सत्तेचा वापर

By Admin | Updated: July 12, 2014 00:25 IST2014-07-12T00:09:59+5:302014-07-12T00:25:02+5:30

वैभव नाईक यांची टीका : जनतेच्या तोंडाला पाने पुसली

Use the power of Rane Company for your welfare | राणे कंपनीकडून आपल्या भल्यासाठी सत्तेचा वापर

राणे कंपनीकडून आपल्या भल्यासाठी सत्तेचा वापर

कणकवली : नारायण राणे व त्यांच्या समर्थकांच्या कंपनीने सत्तेचा उपयोग केवळ आपल्या भल्यासाठीच केला आहे. जनतेच्या तोंडाला पाने फुसण्याबरोबरच त्यांनी जनतेला केवळ लुबाडले असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, ओसरगाव येथे झालेल्या बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. राजन तेलींना विधानपरिषदेत आमदार बनविण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले, असे सांगणाऱ्या नारायण राणेंना आमदारकी मिळविण्यासाठी एवढा खर्च का करावा लागतो? याचे उत्तर द्यावे. राणे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे गेल्या काही वर्षात मोठी संपत्ती गोळा झाली. त्यामुळे आता कार्यकर्त्यांकडे गाड्याच गाड्या झाल्या आहेत, असे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब नमूद करतात. याचा अर्थ राणे व त्यांच्या समर्थकांनी सत्तेचा उपयोग केवळ आपल्याच भल्यासाठी केला हे सिद्ध होते.
राजकारणातून आपल्या समर्थकांनी संपत्ती उभारली आहे हे राणेंनी बैठकीत मान्य केले. विधानपरिषदेत आमदार बनविण्यासाठी कोट्यवधी रूपये लागले. हे रूपये आले कुठून? सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न ८१ हजार असल्याचे राणे सांगतात. त्याचवेळी सिंधुदुर्गातील १ लाख ९१ हजार कुटुंबांमधील ९० हजार कुटुंबे दारिद्रयरेषेखालील यादीत आहेत. या कुटुंबांचे उत्पन्न ४० हजारांपेक्षा जास्त नाही.
प्रत्येक कुटुंबात सरासरी ५ माणसे धरली तरी ९० हजार कुटुंबातील ४ लाख ५० हजार लोकांचे वर्षाचे दरडोई उत्पन्न ८ हजार रुपयांपेक्षा अधिक नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ९ लाख आणि एकूण वार्षिक उत्पन्न ७ हजार ८०० कोटी रूपये आहे. या उत्पन्नापैकी ४ लाख ५० हजार लोकांच्या वाट्याला केवळ ३६० कोटी रूपये उत्पन्न येते. याचाच अर्थ उरलेल्या निम्म्या लोकसंख्येच्या वाट्याला तब्बल ७ हजार ४४० कोटी रूपये इतके उत्पन्न येते. म्हणजेच एकूण उत्पन्नापैकी बराचसा हिस्सा मुठभर श्रीमंतांकडे आहे.
या मुठभर श्रीमंत लोकांत गाड्या खरेदी करणारे, ठेकेदारी मिळविणारे राणे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. दारिद्रयरेषेखालील कुटुंब प्रमुखाचा संसाराचा रहाटगाडा हाकताना जीव मेटाकुटीला येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतरत्र कुठेही नसेल एवढी आर्थिक विषमता आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्नाचे आकडे फुगवून सांगितल्याने जिल्ह्यातील आर्थिक विषमता संपणार नाही.
आज राणेंना आपण निर्माण केलेले ठेकेदारच आपल्यावर उलटले याचा पश्चाताप करावा लागत आहे. राणेंच्या याच ठेकेदारांनी सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे. म्हणून आम्ही इतकी वर्षे आवाज उठवत होतो. तेव्हा राणेंना काहीही वाटत नव्हते, मात्र आज चित्र त्यांच्यावरच पालटले तेव्हा त्यांना ठेकेदारी दिसू लागली आहे. राणेंचे पुत्र नीतेश राणे यांनी पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणून सर्वप्रमुख पक्षशिस्त मोडली. त्यानंतर तेली, पडते, कुडाळकर यांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे नारायण राणेंना शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर ती सर्वप्रमुख नीतेश राणेंवरच करावी लागेल, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Use the power of Rane Company for your welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.