कणकवलीत राणेंचे निर्विवाद वर्चस्व

By Admin | Updated: October 19, 2014 22:25 IST2014-10-19T22:15:02+5:302014-10-19T22:25:25+5:30

जठार यांना पुन्हा आमदार होण्यापासून रोखले

Uncontested domination of Kankavlat Rana | कणकवलीत राणेंचे निर्विवाद वर्चस्व

कणकवलीत राणेंचे निर्विवाद वर्चस्व

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांचा काँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांनी तब्बल २५ हजार ९७९ मतांनी पराभव करत निर्विवाद वर्चस्व मिळविले. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांच्यावर अवघ्या ३४ मतांनी मात करीत प्रमोद जठार यांनी विजय मिळविला होता. परंतु यावेळी नीतेश राणे यांनी जठार यांना पुन्हा आमदार होण्यापासून रोखले आहे. प्रमोद जठार यांना ४८ हजार ७३६ तर नीतेश राणे यांना ७४ हजार ७१५ मते मिळाली.कणकवली महाविद्यालयातील एचपीसीएल सभागृहात रविवारी मतमोजणी प्रक्रिया अतिशय शांततेत व सुरळीत पार पडली. या मतमोजणीसाठी सी.आर.पी.एफ. जवान तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीमध्ये शिवसेनेच्या सुभाष मयेकर यांनी १२ हजार ८६३, राष्ट्रवादीच्या अतुल रावराणे यांना ८ हजार १९६ तर काँग्रेस बंडखोर उमेदवार विजय कृष्णाजी सावंत यांना ७ हजार २१५ मते मिळाली.
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. तुळशीराम रावराणे यांना १ हजार ३२६, बहुजन समाज पार्टीच्या चंद्रकांत जाधव यांना ८२७ तर विजय श्रीधर सावंत उर्फ विजू पटेल यांना ७00 मते मिळाली. १३८१ मतदारांनी नकाराधिकाराचा (नोटा) वापर केला. ४१८ पोस्टल मते होती. यापैकी ३ मते अवैध ठरली. तर ६ मतदारांनी नकाराधिकार वापरला. अतुल रावराणे यांना ४, प्रमोद जठार यांना १७२, नीतेश राणे यांना १९६, सुभाष मयेकर यांना २१, तुळशीराम रावराणे यांना १, विजय कृष्णाजी सावंत यांना १७ तर विजू पटेल यांना १ पोस्टल मत मिळाले.
२४ फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या नीतेश राणे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. फक्त पाचव्या फेरीमध्ये नीतेश राणेंपेक्षा २६४ जास्त मते प्रमोद जठार यांना मिळाली. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्वच फेऱ्यांमध्ये नीतेश राणे यांनी आघाडी घेत सरतेशेवटी २५ हजार ९७९ मतांनी विजय संपादन केला.
नीतेश राणे दाखल
मतमोजणीला प्रारंभ होऊन मतांची आघाडी मिळाल्यानंतर मतमोजणी केंद्रातून नीतेश राणे बाहेर पडले. मतमोजणी पूर्ण होऊन विजयी झाल्यानंतर पुन्हा मतमोजणी केंद्रात नीतेश राणे दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, मधुसूदन बांदिवडेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. कणकवली मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे यांनी नीतेश राणे यांना विजयी घोषित केले. त्यानंतर त्यांना विजयी उमेदवाराला दिले जाणारे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार समीर घारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. नीतेश विजयी झाल्याचे समजताच नारायण राणे यांनी मतमोजणी केंद्राजवळ जात त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन
केले. (वार्ताहर)

कोणत्या कारणामुळे
पक्ष जिंकला
नीतेश राणे यांनी गेले दोन महिने मतदारसंघातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील बहुतांशी गावात लोकांच्या थेट गाठीभेटी घेत संपर्क साधला होता. याचा त्यांना फायदा झाला.

कणकवली मतदारसंघात पंचरंगी निवडणूक झाली. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्यामध्ये मतविभागणी झाली. त्यामुळे एरव्ही राणेंविरोधात एकवटणारे हे सर्वजण दुभंगले गेल्याने त्याचा फायदा काँग्रेसला पर्यायाने नीतेश राणे यांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झाला.

या निवडणुकीत नीतेश राणे यांनी वैयक्तिक टिकाटिप्पणी अथवा जाहीर सभा न घेता गाठीभेटींवरच भर दिला. त्यामुळे ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचू शकले. त्याचा फायदा त्यांना झाला. ते या मतदारसंघात सर्वात जास्त गावांमध्ये पोहचले होते.

सुभाष मयेकर, अतुल रावराणे, विजय कृष्णाजी सावंत, चंद्रकांत जाधव, तुळशीराम रावराणे, विजय सावंत यांचे डिपॉझीट जप्त झाले.



नीतेश राणे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबरच स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राबविलेली प्रचारयंत्रणा प्रभावी ठरली.

नीतेश राणे यांनी मतदारसंघात गावभेटी आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.

Web Title: Uncontested domination of Kankavlat Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.