कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावरून खडाजंगी; नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत तणाव

By सुधीर राणे | Published: April 5, 2023 05:29 PM2023-04-05T17:29:16+5:302023-04-05T17:29:34+5:30

सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

Unauthorized construction in Kankavali town; Tension in the general meeting of the municipal council | कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावरून खडाजंगी; नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत तणाव

कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावरून खडाजंगी; नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत तणाव

googlenewsNext

कणकवली: कणकवली शहरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्यावरून नगरपंचायतची सर्वसाधारण सभा गाजली. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये या मुद्यावरून जोरदार खडाजंगी उडाली. त्यामुळे काही वेळ सभेतील वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

कणकवली नगरपंचायतची सर्वसाधारणसभा प.पू.भालचंद्र महाराज सभागृहात बुधवारी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरसेवक तसेच कर्मचारी उपस्थित होते. 

या सभेत कन्हैया पारकर हे आपल्या घराची घरपट्टी नगरपंचायतीकडे भरत नाहीत असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. यावरून कन्हैया पारकर आक्रमक झाले. त्यांनी आपण घरपट्टी भरत नसल्याचे सिद्ध करा असे आव्हान सत्ताधाऱ्याना  दिले. त्यावरून नगराध्यक्ष समीर नलावडेही आक्रमक झाले. नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे यांना त्याबाबत सभागृहास माहिती देण्यास सांगितले. 

त्यावेळी त्यांनी पारकर यांच्या निवासस्थानाच्या दुसऱ्या मजल्याची कर आकारणी अजून झाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी कन्हैया पारकर यांनी ते जर खरे असेल तर  नियमानुसार नगरपंचायतीने कर आकारणी करावी,त्याबाबत आमचे काहीही म्हणणे असणार नाही.असे सांगितले. या मुद्यावरून नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर, विराज भोसले,अबीद नाईक, मेघा गांगण, रुपेश नार्वेकर, सुशांत नाईक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.एकमेकांवर जोरदार आरोप करण्यात आले.

यावेळी सभागृहात फक्त चर्चा करण्यापेक्षा नगरपंचायत प्रशासनाने रितसर आम्हाला नोटीस द्यावी आणि कार्यवाही करावी असे कन्हैया पारकर यांनी सांगितले. तर तुम्ही नगरसेवक असून प्रथम घरपट्टी भरा आणि नंतरच आवाज चढवून बोला.असे नगराध्यक्षांनी कन्हैया पारकर यांना सांगितले. तसेच आजच्या आज त्या इमारतीची कर आकारणी करा, अशी सूचनाही नगरपंचायत प्रशासनाला नगराध्यक्षानी केली.

यावेळी पारकर यांची इमारत अधिकृत आहे की अनधिकृत  याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. तर ती मालमत्ता माझ्या नावावर नाही आणि तिची घरपट्टीही  थकीत नाही असे कन्हैया पारकर म्हणाले. रुपेश नार्वेकर यांनी शहरातील सर्वच अनधिकृत बांधकामांची चौकशी करून कर आकारणी करा अशी सूचना मांडली.यावर अबीद नाईक यांनी ही सूचना चांगली असून नगरपंचायतच्या उत्पन्नात कर वसुलीमुळे आणखीन भर पडेल असे सांगितले. या मुद्यावरून बराच वेळ नगरसेवकांमध्ये वादंग झाला. 

त्यानंतर नगरपंचायत भाजी मार्केट बाबत नेमकी काय स्थिती आहे? त्याची माहिती मुख्याधिकाऱ्यानी द्यावी अशी मागणी कन्हैया पारकर यांनी केली.त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संबधित कामाबाबत आपण माहिती घेतो. विकासकाने  अटीशर्तीचा भंग केला आहे का? हे पाहतो आणि सभागृहाला माहिती देतो असे यावेळी सांगितले. तर भाजी मार्केट प्रमाणेच एसटी स्टँड येथील  गाळ्यांचीही अनेकांना प्रतीक्षा असल्याचा टोला बंडू हर्णे यांनी पारकर यांना यावेळी लगावला. 

या सभेत नगरपंचायतच्या जुन्या भाजीमार्केट जवळील स्वछतागृहासाठी ८० लाख रुपये खर्च केला जाणार असल्याचा मुद्दाही गाजला.तर नगरपंचायत कार्यालयाजवळील भंगार लिलावाचे पुढे काय झाले ? असा प्रश्न विरोधी नगरसेवकांनी उपस्थित केला होता. या मुद्द्यांसह विकास कामांबाबतच्या इतर मुद्यांवरही चर्चा झाली. काही महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. 

Web Title: Unauthorized construction in Kankavali town; Tension in the general meeting of the municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.