सिंधुदुर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालय देणार- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:26 PM2020-06-19T15:26:36+5:302020-06-19T15:30:33+5:30

सिंधुदुर्गात रेण्वीय निदान ( मॉलिक्युलर) व आरसीपीटीआर कोविड लॅब प्रयोगशाळेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे याचा जिल्हावासियांना लाभ होणार आहे. सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी देखील आपण पूर्ण करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

Uddhav Thackeray to provide medical college and state-of-the-art hospital for Sindhudurg | सिंधुदुर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालय देणार- उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग येथील कोरोना प्रयोगशाळेचे ऑनलाईन उदघाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्गासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालय देणार-उद्धव ठाकरेमॉलिक्युलर आणि आरटीपीसीआर कोविड प्रयोगशाळेचे लोकार्पण

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात रेण्वीय निदान ( मॉलिक्युलर) व आरसीपीटीआर कोविड लॅब प्रयोगशाळेमुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्या जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे याचा जिल्हावासियांना लाभ होणार आहे. सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी देखील आपण पूर्ण करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

जिल्हा रुग्णालयात एकुण 3 कोटी 21 लाख 83 हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उद्घाटन केले.

निसर्गरम्य कोकणावर माझे नेहमी प्रेम राहिले आहे. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन खंबीरपणे उभे राहील असे सांगून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने अत्यंत कमी कालावधीत या प्रयोगशाळा उभ्या केल्या त्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले तसेच या प्रयोगशाळेतून यापुढे कोरोनाच्या पॉझिटीव्ह चाचण्या येऊ नयेत यासाठी प्रार्थना करेन असेही ते म्हणाले.

मी प्रत्येक भाषणाच्या वेळी जमलेल्या तमाम बंधु भगिनींनो असे बोलायचो तथापि आता दिवस असे आलेत की, हे एकत्रित जमणे विखुरलेल्या अवस्थेत आले आहे. आणि त्यामुळेच आज प्रत्यक्ष नाही तर ऑनलाईन पद्धतीने या कोविड लॅबचा लोकार्पण करत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. सिंधुदुर्गात लॅब उभी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिंधी यांची तळमळ फार महत्वाची होती. ही लॅब उभी करण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्यात आला त्या दृष्टीने शासन निर्णय ही काढण्यात आला.

निर्णयामध्ये तत्परता गतीमानता असली पाहिजे. राज्य पातळीवर शासनाने जे काम केले त्याला साजेस काम जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे ही लॅब तातडीने उभी राहिली त्यामुळे प्रशासनाचे अभिनंदन. असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्र हा जीव की प्राण आहे. तर कोकण हा आमच्यासाठी पाठीचा कणा आहे त्यामुळेच कोकण नेहमी शासनाच्या पाठी राहिला आहे.

आज ज्या लॅबचे लोकार्पण झाले याचे मला खूप समाधान आहे. तळकोकणामध्ये एखादा रोग उद्भवल्यास उपचारासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात अथवा गोवा किंवा अधिक गंभीर स्थिती असेल तर मुंबईत जावे लागते अशी परिस्थिती आजपर्यंत होती आता ही परिस्थिती बदलेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले मुंबईमध्ये 2007 साली कस्तुरबा रुग्णालयात पहिली मॉलिक्युलर लॅब सुरु झाली. त्यानंतर पुणे येथे दुसरी लॅब झाली. त्याकाळी दोनच लॅब राज्यात कार्यान्वित होत्या. आज मला एका गोष्टीचे समाधान आहे जवळपास राज्यात शंभर लॅब सुरु झाल्या आहे. यापुढे हाच प्रयत्न् असणार आहे. अशा लॅब प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात असली पाहिजे.

याचे कारण जर का कोरोना सोबत जगायचे असेल तर कोरोनाचे निदान लवकरात लवकर आणि त्यावर औषधोपचार सुरु होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आरोग्य विषयक सुविधा राज्यभर पोहोचवायच्या आहेत. आरोग्य विषयक आलेले संकट हे मोठे असते, महाराष्ट्रात कोठेही आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत असे होता कामा नये.

सिंधुदुर्गात आज कोरोना टेस्टिगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे त्यामुळे मोठे काम झाले आहे. त्यामुळे तुम्हाला हायसे वाटेल. तरीही कोरोना बदल जागरुक राहून सजगतेने काम करावे कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होवू नये. कोकणामध्ये यापुढे कोणतेही रोगराई येऊ नये. तसेच हे कोकण निसर्गरम्य राहो याठिकाणी प्रदुषणमुक्त वातावरण राहो यासाठी जे काय करता येईल ते करा या कामासाठी राज्य शासन आपल्या सोबत राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून रेण्वीय (मॉलिक्युलर) निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर कोविड लॅब तातडीने मंजूर करुन दिल्यामुळे सिंधुदुर्गाच्या आरोग्य यंत्रणेत खुप मोठी भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव येत्या महिन्याभरात तातडीने शासनास सादर करण्यात येईल. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा विकासाचा बाबतीत नेहमी अग्रेसर राहिल यासाठी प्रयत्नशील राहीन.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेण्वीय (मॉलिक्युलर) निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर कोविड लॅबचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना निदानाबरोबरच माकडताप व अन्य साथीच्या रोगाचे निदान आता स्थानिक स्तरावरच होणार आहे. ही आरोग्य विभागाच्या दृष्टीने अत्यंत भुषणावह बाब आहे. ही लॅब उभी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन. ही लॅब उभी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी मिळाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांचेही मनपुर्वक आभार.

प्रारंभी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या रेण्वीय (मॉलिक्युलर) निदान प्रयोगशाळा व आरटीपीसीआर कोविड लॅब उभारणी बाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या विशेष माहितीपटाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी खासदार विनायक राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते, संदेश पारकर, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
 

Web Title: Uddhav Thackeray to provide medical college and state-of-the-art hospital for Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.