कणकवली : 'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', 'या महायुती सरकारचे करायचे काय?' अशा जोरदार घोषणा देत उद्धवसेनेच्यावतीने आज, शुक्रवारी कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली येथील ठेकेदार हर्षल पाटील यांचे कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याबाबत त्यांना उद्धवसेनेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सिंधुदुर्गात असे हर्षल पाटील होऊ नये यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासन द्यायचे असून सत्ताधारी केवळ आश्वासन देतात. मात्र, ठेकेदार देशोधडीला लागले असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. तसेच आमच्या पक्षात या मग बिले देतो असे सांगून अनेक ठेकेदाराना सत्ताधाऱ्यानी आपल्या पक्षात घेतले. मात्र, त्यांनाही अजून बिलांचे पैसे न मिळाल्याने ते ठेकेदार अजून ताटकळतच असल्याचा टोला त्यांनी लगावला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, केवळ आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या ठेकेदारांचे पैसे मिळवून द्यावेत व सिंधुदुर्गात हर्षल पाटील सारखी घटना टाळावी असे आवाहन केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू शेट्ये, राजू राणे, कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, राजू राठोड, तेजस राणे, गुरु पेडणेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
'सत्ताधारी तुपाशी, ठेकेदार उपाशी', ठेकेदारांच्या थकीत बिलांसाठी उद्धवसेनेचे कणकवलीत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:57 IST