कोकणात उद्धवसेनेला पुन्हा धक्का, खारेपाटण येथील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 25, 2025 17:26 IST2025-03-25T17:25:20+5:302025-03-25T17:26:09+5:30
संतोष पाटणकर खारेपाटण : उद्धवसेनेच्या खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, कणकवली युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत ...

कोकणात उद्धवसेनेला पुन्हा धक्का, खारेपाटण येथील पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
संतोष पाटणकर
खारेपाटण : उद्धवसेनेच्या खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुख सतीश गुरव, कणकवली युवा सेना उपतालुका प्रमुख तेजस राऊत तसेच खारेपाटण उपविभागप्रमुख निखील गुरव यांनी आपल्या पदाचा व पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी लेखी राजीनामा शिवसेना जिल्हाप्रमुख व युवा जिल्हाप्रमुख यांचेकडे सादर केला आहे. यामुळे खारेपाटण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, खारेपाटण मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक एकाच वेळी पक्ष श्रेष्ठीकडे देण्यात आलेल्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सद्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. राजीनामे दिलेले पक्षाचे कट्टर कार्यकर्ते तथा पदाधिकारी आता कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
..त्यामुळे व्यथित अंतकरणाने राजीनामा
दरम्यान या राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षाचे आम्ही प्रामाणिक काम करत असून पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे संभाळून पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. तर ज्वलंत हिंदुत्व व समाजकारण हाच वारसा आम्हा शिवसैनिकांना बाळासाहेबांकडून मिळालेला आहे.
परंतु अलीकडच्या काळात उद्धवसेना पक्षाची वाटचाल ही हिंदुत्वापासून दूर होत चाललेली दिसत आहे. त्यामुळे व्यथित अंतकरणाने आम्ही आमच्या पदाचा व पक्ष सदस्यत्वचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद करण्यात आले आहे.