कणकवली तालुक्यातील अनधिकृत सिलिका उत्खननासह वाहतुकीवर कारवाई करा, उद्धवसेनेची मागणी

By सुधीर राणे | Updated: April 22, 2025 16:31 IST2025-04-22T16:30:48+5:302025-04-22T16:31:13+5:30

अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

Uddhav Sena demands action against unauthorized silica mining and traffic in Kankavali taluka | कणकवली तालुक्यातील अनधिकृत सिलिका उत्खननासह वाहतुकीवर कारवाई करा, उद्धवसेनेची मागणी

कणकवली तालुक्यातील अनधिकृत सिलिका उत्खननासह वाहतुकीवर कारवाई करा, उद्धवसेनेची मागणी

कणकवली: तालुक्यातील कासार्डे येथे सिलिका वाळू ट्रेडिंग व विक्री परवान्याच्या नावावर अवैध सिलिका वाळू उत्खनन हे  'इको सेन्सिटिव्ह झोन' मध्ये होत आहे. तात्पुरती बिनशेती न घेता तसेच बनावट पासच्या आधारे वाहतूक होत आहे. ट्रेडिंग लायसन्सच्या नावाखाली उत्खनन कसे केले जाते? यावर प्रशासनाचा अंकुश दिसत नाही. याबाबत ५ मेपर्यंत कारवाई न केल्यास मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना दिला.

याबाबत माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव, तेजस राणे व इतरांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कासार्डे गावात अधिकृत सिलिका वाळू उत्खनन करणाऱ्या दोन खाणपट्ट्यांना मान्यता असून त्याठिकाणी मान्यता नसलेले ट्रेडिंग व विक्री परवानाधारक मोठ्या प्रमाणात उत्खनन करतात. ट्रेडिंग परवाना व विक्री परवानाधारकांना कोणत्याही प्रकारचे उत्खनन व वाळू वॉशिंग प्लान्टद्वारे सिलिका वाळू धुण्याचे अधिकार नाहीत. तसेच ट्रेडिंगधारक व विक्री परवानाधारक यांना अनधिकृतरित्या सिलिका वाळू धुण्याकरिता वाळूने हौद बांधायचे नाहीत. ट्रेडिंग परवानाधारक विक्री परवानाधारकांनी मंजूर खाणपट्ट्यातील लिजधारकांडून तयार माल घेऊन तो विक्री करायचा आहे. २०१३ च्या अधिसूचनेत ते स्पष्ट नमूद आहे.

ट्रेडिंग व विक्री परवानाधारकांना तयार माल ठेवण्याकरिता नियमातील तरतुदीप्रमाणे तात्पुरती बिनशेती केलेली तहसीलदार कणकवली यांच्याकडे आढळत नाही. ठळक बोर्ड लावलेले दिसत नाहीत. तसेच सर्व तपशील असलेले रजिस्टर टेडर्स धारकांनी ठेवायचे आहेत. ते ट्रेडरधारक ठेवत नाहीत.  तपासणीवेळी प्रांताधिकारी, तहसीलदारांनी शेरा मारायचा आहे, तो मारला जात नाही. विक्री मालाचे रजिस्टर एक वर्ष राखून ठेवायचे असताना ते ठेवले जात नाही हे ट्रेडिंग व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

कासार्डे गावातील नाग सावंतवाडी व धारेश्वर कासार्डे ही गावे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येत आहेत. या भागात कोणतेही उत्खनन, कोणत्याही खनिजांची कार्यवाही करायची नाही. पंरतु, कार्यवाही होत असलेल्या २८ परवानग्यांना २०२१ मध्ये स्थगिती दिलेली आहे. आज काही वाहने विना पासवर किंवा कमी वजन दाखवून १४ टायर व २० टायर अवजड वाहनांतून मोठ्या प्रमाणात कोल्हापूरच्या दिशेने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे कोल्हापूरला जोडणारे दोन्ही रस्ते खड्डेमय व नादुरुस्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या क्षेत्राच्या २०० मीटरवर कोणतेही मायनिंग असू नये, अशी आमची माहिती असून ती तपासून २०० मीटरवर सर्व ट्रेडिंग लायसन्स व विक्री परवाना रद्द करावेत. यापूर्वी ज्यांना ४ कोटी दंड झालेला आहे, त्यांना वसुलीच्या नोटिसा काढून वसुली न झाल्यास टेंडरधारक व विक्री परवानाधारकांच्या थकबाकी स्थावर मालमत्तेवर दंडरुपी बोजा ठेवून जिल्हाधिकारी यांच्याकडे स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी परवानगी मागविण्यात आली, ती अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच २०२१ च्या शासन निर्णयानुसार ईटीएसद्वारे मोजणी आवश्यक असून ती न झालेल्या खाणींना स्थगिती देण्यात यावी. याबाबत कार्यवाही न झाल्यास मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Uddhav Sena demands action against unauthorized silica mining and traffic in Kankavali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.