सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार
By Admin | Updated: October 16, 2014 00:08 IST2014-10-15T23:24:52+5:302014-10-16T00:08:52+5:30
कुडाळात सरासरी ६५ टक्के मतदान.. सर्वत्र शिवसेना व मनसेचे बुथ..स्वागतासाठी रांगोळ्या

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले आहे. सावंतवाडी मतदारसंघात सर्वसाधारणपणे शिवसेना व मनसेचेच बुथ दिसले. मात्र, भाजपचे बांदा व दोडामार्ग वगळता अन्य ठिकाणी बुथच दिसले नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादीला तर सर्व ठिकाणीच फटका बसल्याचे जाणवत होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दुपारी सांगेलीतील मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रमुख पाच पक्ष उभे ठाकले आहेत. त्यातील चार उमेदवारांमध्ये खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. यात काँॅग्रेसचे बाळा गावडे, शिवसेनेचे दीपक केसरकर, भाजपचे राजन तेली आणि मनसेचे परशुराम उपरकर यांच्यात ही लढत होणार आहे.
सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग : सावंतवाडी मतदारसंघात बुधवारी सकाळपासूनच मतदान शांततेत सुरू होते. कुठल्याही मतदारकेंद्रावर विशेष अशी गर्दी दिसत नव्हती. सावंतवाडी, बांदा तसेच वेंगुर्ले शहरात सकाळपासून गर्दीचा ओघ कमी होता. शहरी भागात दरवेळीपेक्षा मतदानाची सरासरी कमी झाली असल्याचे दिसून येत होते. सावंतवाडी मतदारसंघात अकरा वाजेपर्यंत फक्त १६.८९ टक्के मतदान झाले होते. ही आकडेवारी सर्वच ठिकाणी सारखी होती. तळवडे, आरोंदा, मळेवाड, शिरोडा, रेडी या ठिकाणी तर पक्षाच्या बुथवरही कार्यकर्त्यांची संख्या कमी होती. तसेच मतदान केंद्रात मतदारही कमी दिसत होते.निवडणूक अधिकारी हा आकडा सांयकाळपर्यंत वाढेल, या विश्वासावर होते. दुपारी ३ वाजेपर्यंत तर हा आकडा तसाच होता. सावंतवाडी तालुक्यात तर २९ टक्के एवढेच मतदान झाले होते. तर पूर्ण मतदारसंघात ही टक्केवारी ३७.३२ टक्क्यांपर्यंत गेली होती. सुमारे ८१,७४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मागील लोकसभा निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले होते. त्या तुलनेत हे मतदान फारच कमी होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढेल, अशी खात्री होती. पण शेवटपर्यंत ही आकडेवारी वाढली नाही. पाच वाजेपर्यंत सावंतवाडीत ५२.८६, दोडामार्ग ५१.४१ तर वेंगुर्लेत ४६.७१ टक्के एवढे मतदान झाले. तर सावंतवाडी शहरात ५१ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे.
मतदानाची शेवटची आकडेवारी सरासरी ६५ टक्यापर्यंत गेली आहे. मतदानाची आकडेवारी एवढी कमी झाल्याने सर्वच उमेदवार चिंतेत पडले आहेत. अंतिम आकडेवारी येण्यासाठी किमान रात्रीचे दहा वाजणार, असे मत निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी व्यक्त केले आहे.
पाटमध्ये हाणामारी झाल्याची चर्चा पाट येथे मतदानादिवशी दुपारी हाणामारी झाल्याची चर्चा होती. याबाबत येथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख उमेदवारांचा मतदारसंघात फेरफटका सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार दीपक केसरकर यांनी सकाळी सावंतवाडी शहर, तालुका तसेच वेंगुर्ले दोडामार्गमध्ये बुथवरील कार्यकर्त्यांना भेटी दिल्या. मनसे उमेदवार परशुराम उपरकरांनीसुद्धा वेंगुर्ले, सावंतवाडीत भेट दिल्यावर सायंकाळी दोडामार्गला भेट दिली. तर भाजपाचे उमेदवार राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातच फेरफटका मारला.
सर्वत्र शिवसेना व मनसेचे बुथ
सावंतवाडी मतदारसंघात सर्वच ठिकाणी शिवसेनेचे बुथ लावण्यात यश आले. त्यानंतर मनसेने मतदारसंघात बुथ लावल्याचे दिसून येत होते. पण भाजप व राष्ट्रवादी यांचे बांदा आणि दोडामार्ग वगळता बुथच लावले गेले नाहीत. काँॅग्रेसचे मात्र, तिन्ही तालुक्यात महत्त्वाच्या ठिकाणी बुथ दिसत होते.
विधानसभा निवडणुकीचे आज झालेले मतदान जिल्ह्यात २० वर्षांनी प्रथमच शांततेत झाले. दरम्यान, दुपारच्या सुमारास सावंतवाडीमध्ये राडा झाल्याची बातमी जिल्हाभर पसरल्याने खळबळ माजली. जिल्ह्यातील कणकवली, मालवणसह सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावातून सावंतवाडी शहरात राजकीय पुढाऱ्यांना फोन येऊ लागले.
मोठ्या प्रमाणात अफवांचे पीक
सावंतवाडी शहरात कार्यकर्र्त्याची संख्या जास्त दिसत होती. यावेळी हाणामाऱ्याही झाल्या असल्याचे समजताच सिंधुुदुर्ग जिल्हाभर खळबळ पसरली होती. मात्र, सर्व नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनीही फोनाफोनी करत अशा काही घटना घडल्यात का? याबाबत शहानिशा केली असता अफवा पसरवल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे एकच धावपळ उडाली. मात्र, तालुक्यात चौकशी केली असता याप्रकरणी कोणताही राडा अथवा भांडणे झाली नसल्याचे स्पष्ट झाले. या सर्व अफवाच असल्याचे समजल्यावर नागरिकांसह कार्यकर्त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. (प्रतिनिधी)
1या निवडणुकीवेळी काही मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याने मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधताना अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अचानकरित्या मतदान यादीतून मतदारांची नावे गहाळ झाल्याने मतरदारांनी यावेळी संताप व्यक्त केला.
2सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नावे गहाळ होण्याचे प्रकार घडले. गेली कित्येक वर्षे मतदान करणाऱ्यांचीही नावे या विधानसभा यादीत नसल्याने मतदारांनी आश्चर्य व्यक्त केले. याचा फटका काही पक्षांनाही बसला आहे. काही पक्षांच्या कट्टर समर्थकांचीच नावे यादीतून गायब झाल्याने मतदानात घट होण्याच्या भीतीने पक्षीय पदाधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले होते.
3बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांबाहेर लावण्यात आलेले विविध पक्षांचे बुथही एकमेकांशेजारी असल्याचे दिसून आले. सावंतवाडीतील भटवाडी येथे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे बुथप्रमुखांसह कार्यकर्तेही एकत्रितपणे खेळीमेळीच्या वातावरणात दिसत होते. शेतकऱ्यांनीही मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच भातशेतीच्या कामांना सुरुवात केली.
4सावंतवाडी तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीत सर्व मतदारांनी सुरक्षित मतदान केले. एकमेकासमोर बुथ लावलेल्या काँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या सर्व बुथवरील कार्यकर्ते एकत्र येऊन राजकीय गप्पागोष्टींमध्ये रंगले होते. सावंतवाडीतील सर्व भागात मतदान शांततेत पार पडले. त्यामुळे साहजिकच मतदानाच्या दरम्यान बुथवरील कार्यकर्त्यांमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. सकाळच्या सत्रात झालेल्या कमी मतदानामुळे बुथवर बसलेल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकमेकांशी चर्चा वाढली होती. यामुळे या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असलेले एक अपवादात्मक चित्रही यानिमित्ताने पहायला मिळाले.
5निवडणूक अधिकारी ई. रविंद्रन तसेच केंद्रीय निरीक्षक सतिशकुमार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी सांगेली मतदान केंद्राला भेट दिली. तर सतिशकुमार यांनी विधानसभा मतदारसंघातील २० मतदान केंद्रांना भेटी दिल्या आहेत.
6मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मंगळवारी रात्री मालवण तालुक्यातील पराड गावात काँग्रेस कार्यकर्ते राजू पराडकर हा मतदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून निवडणूक भरारी पथकाच्या स्वाधीन केले. त्याच्याकडून ३०० रुपये जप्त करण्यात आले. अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कुडाळात सरासरी ६५ टक्के मतदान
कुडाळ, मालवण : कु डाळ मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी झालेल्या मतदानात कुडाळ मतदारसंघातील दोन लाख चार हजार आठशे पाच मतदारांपैकी ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे, शिवसेनेचे वैभव नाईक यांच्यासह आणखी सहा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार दिवसभरात घडलेला नाही.
कुडाळ -मालवण मतदारसंघातील निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली आहे. कुडाळ मतदारसंघात काँग्रेस व शिवसेना या पक्षांचेच जास्त बुथ लागलेले दिसले. तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुथ कमी प्रमाणात लागले होते. मात्र, कोणत्याही बुथवर कोणताही अनुचित प्रकार घडल्याची घटना नाही.
कुडाळ मतदारसंघातील निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली होती. त्यांनीही चोख व्यवस्था ठेवल्याने या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडला नाही. तसेच निवडणूक विभाग शाखेने योग्य पद्धतीने या निवडणुकीच्या कामांचे नियोजन केल्यामुळे या ठिकाणी मतदान मशीन बंद पडणे तसेच इतर प्रकार घडले नाहीत. त्यामुळे कोणत्याही मतदान केंद्रावर गोंधळाचा प्रकार घडला नाही. कुडाळातील वालावल, पिंगुळी येथील बुथवर सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कुडाळ शहरातील सर्व मतदान केंद्रांवर सुमारे ६५ ते ७० टक्के असे मतदान झाले. या सर्व मतदानाची सरासरी पाहता कुडाळ शहरात ७० टक्के मतदान झाले. तर मालवण शहरात सकाळपासून मतदानाला अल्प प्रतिसाद लाभत होता. मात्र, दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत मतदान केल्याने मालवण तालुक्यात सुमारे ६५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातून गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले होते. (प्रतिनिधी)
1नवीन युवा वर्गाने पहिल्यांदाच मतदान केले. या वाढलेल्या युवा वर्गाच्या मतदानामुळे मतदानाचे प्रमाण वाढले आहे. या युवा मतदारांचा कल कोणाकडे आहे त्यावरच येथील उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे.
2कुडाळ मालवण मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत ३७ हजार ६९८ मतदारांनी मतदान केले होते. ही टक्केवारी १८.४१ टक्के होती. तर दुपारी ३ पर्यंत ८७ हजार ८२० मतदारांनी मतदान केल्याने ही टक्केवारी ४२.८८ टक्क्यांपर्यंत वाढली होती. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ लाख ११ हजार १३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व एकूण ५८.१७ टक्के मतदान झाले.
3कुडाळ मतदारसंघामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून मतदारांनी दुपारपर्यंत फक्त ३० टक्के मतदान केले होते. कुडाळ-मालवण विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी सकाळी ते दुपारपर्यंत अत्यंत संमिश्र असा प्रतिसाद मतदारांनी मतदानाला दिला. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत या मतदारसंघाचे मतदान १८ टक्के होते. तर ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत येथील मतदान ३० टक्क्यांवर गेले होते.
4हुमरस येथे फिरणाऱ्या मुंबई- खार येथील नितीन वसंत वेंगुर्लेकर याला कुडाळ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी गस्ती करताना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे निवडणुकीच्या धर्तीवर कारवाई करीत ताब्यात घेतले. परजिल्ह्यातील प्रचारासाठी आलेल्या व्यक्तिंना प्रचार संपल्यानंतर परत जाण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्ह्यातील शांतता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. कुडाळ मतदारसंघात दुपारपर्यंत शांततेत मतदान पार पडले. ज्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतील, अशा बुथवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला होता.
5कुडाळ तालुक्यातील इतर गावांपेक्षा माणगाव खोऱ्यात दुपारपर्यंत उत्स्फूर्तपणे ३० टक्के मतदान झाले होते. माणगाव खोऱ्यात मतदानपूर्व संध्येला काही परजिल्ह्यातील युवकांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे माणगाव परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माणगावात एकदोन ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले. मात्र, पोलिसांनी वेळेत मध्यस्थी करत अनुचित प्रकार घडण्यापासून रोखले. या मतदारसंघात तसेच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात महिला मतदार असून यावेळीही गावागावामध्ये मतदानाला बाहेर पडत मतदान केले.
मतदानाला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद
भातशेतीचा हंगाम सुरु झाल्याने शेतकरीवर्गाच्या प्रतिसादावर मतदानाची टक्केवारी ठरणार होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील शेतकरी वर्गानेही मतदानाला हातभार दिला. शेतकऱ्यांनी सकाळच्या सत्रात मतदान करून त्यानंतर शेतीची कामे करण्यास सुरुवात केली होती. सकाळी ७ वाजल्यापासून लवकर मतदानाला सुरुवात झाल्याने गावातील शेतकरी मंडळींसह नोकर मंडळींनीही सकाळीच मतदान उरकून घेतले. तर दुपारनंतर येणाऱ्या पावसाच्या भीतीने शेतकरी वर्गानेही सकाळीच मतदान करूनच शेतांमध्ये प्रवेश केला. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सकाळच्या सत्रात भातकापणीच्या कामांना वेळ देत सायंकाळी मतदान केले.
स्वागतासाठी रांगोळ्या
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निरवडे- कोनापाल, सावंतवाडी शहर, मळेवाड, माजगाव या केंद्रांना शासनाने आदर्श मतदान केंद्रांचा बहुमान दिला आहे. त्यामुळे त्यांच्यातील स्पर्धाही वाढलेली दिसून येते. या मतदान केंद्रांवर रांगोळी उपक्रम, मतदारांचे स्वागत करणारी गाण्यांची कॅसेट सुरू होती. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन देणे हाच यामागचा उद्देश होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मतदान केंद्रांच्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आल्या होत्या. भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच असा उपक्रम राबविला आहे. ग्रामीण भागातील जनताही या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. यावर्षी मतदार केंद्रांवर शेतकरी वर्गही मतदान करण्यासाठी आवर्जून जात होता. काही ठिकाणी मतदारांकरिता पायघड्या व स्वागताचे बॅनरही लावण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागातील मतदार या उपक्रमाचे कौतुक करताना दिसत होते.